दुबई, 8 सप्टेंबर : आयसीसीच्या नव्या टेस्ट क्रमवारीमध्ये (ICC Test Ranking) टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्माला (Rohit Sharma) मोठा फायदा झाला आहे. रोहितने चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 127 रनची खेळी केली होती. यानंतर तो पहिल्यांदाच 800 रेटिंग पॉईंट्सपर्यंत पोहोचला. पॉईंट्सच्या बाबतीत त्याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) पिछाडीवर टाकलं आहे. तर फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो 10 व्या क्रमांकावरून 9व्या क्रमांकावर आला आहे. टीम इंडियाने चौथी टेस्ट 157 रनने जिंकली.
आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीनुसार बॅट्समनच्या टॉप-10 यादीत बदल झालेला नाही, पण रेटिंग बदलले आहेत. रोहितला चौथ्या टेस्टनंतर 40 पॉईंट्सचा फायदा झाला आहे. रोहित 813 पॉईंट्ससह पाचव्या आणि विराट 783 पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रूट पहिल्या, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन दुसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचाच मार्नस लाबुशेन चौथ्या क्रमांकावर आहे.
टॉप-10 मध्ये दोन भारतीय बॉलर
जसप्रीत बुमराहने चौथ्या टेस्टमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या, त्यामुळे 771 पॉईंट्ससह तो 9व्या क्रमांकावर आला आहे. अश्विन 831 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. अश्विनला इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये एकही मॅच खेळण्याची संधी मिळालेली नाही. इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसनला 2 स्थानांचं नुकसान झालं आहे. तो पाचव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर गेला आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स 908 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.
शार्दुल टॉप-20 मध्ये
ऑलराऊंडर शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) चौथ्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतकं केली. याशिवाय त्याला 3 विकेटही मिळाल्या. ऑलराऊंडरच्या यादीत तो 20 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडच्या क्रिस वोक्सन टॉप-10 मध्ये स्थान पटकावलं आहे. भारताविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये वोक्सने 7 विकेट घेतल्या आणि अर्धशतक ठोकलं. वोक्स ऑलराऊंडरच्या क्रमवारीत 9व्या क्रमांकावर, रविंद्र जडेजा तिसऱ्या आणि अश्विन पाचव्या क्रमांकावर आहेत.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.