मेलबर्न, 07 मार्च : आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 8 मार्च रोजी होणार आहे. हा हायवोल्टेज अंतिम सामना मेलबर्नच्या (MCG) मैदानावर होईल. भारतानं याआधी ऑस्ट्रेलियाला साखळी सामन्यात नमवले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने चारवेळा टी-20 वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले आहे. दरम्यान, या स्पर्धेत पावसाने चाहत्यांना निराश केले. पावसामुळं भारत-इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामनाही रद्द झाला. आयसीसीच्या नियमानुसार भारताने थेट फायनलमध्ये प्रवेश केला. तर, दुसरा सामन्याचा निकाल डकवर्थ लुइसने लागला. मात्र आता फायनल सामन्यावरही काही प्रमाणात पावसाचे सावट आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मेलबर्नमध्ये काही प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र सकाळी काही काळ पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यानंतर पूर्ण दिवस ऊन असेल. त्यामुळं सामना होऊ शकतो. तर, सायंकाळी थोडासा थंडावा असेल मात्र, आकाश स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, आयसीसीच्या वतीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळं पावसामुळे सामना न झाल्यास हा सामना सोमवारी राखीव दिवशी होईल.
वाचा-आफ्रिकेचं स्वप्न भंगलं, वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतासोबत भिडणार ऑस्ट्रेलिया
दरम्यान, उपांत्य सामन्यांमध्ये अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामन्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळं गुणतालिकेनुसार भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्या उपांत्य सामन्यालादेखील पावसाने फटका बसला परंतु ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमांतर्गत दक्षिण आफ्रिकेला पाच धावांनी पराभूत करून विजेतेपद जिंकले.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना भारताची भीती
भारतीय संघाने साखळी सामन्यात एकही सामना गमावला नाही. त्यामुळं भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघाची स्टार फलंदाज शेफाली वर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात जास्त धावा शेफालीने केल्या आहेत. त्यामुळं ऑस्ट्रेलियन संघाची प्रमुथ गोलंदाज मेगन स्कट, भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना चांगलीच घाबरलेली आहे. स्मृती आणि शफालीसमोर मी पॉवरप्लेमध्ये गोलंदाजीच करणार नसल्याचं स्कटने म्हटलंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्टकने 17 धावांत 2 विकेट घेत महत्वाची भूमिका बजावली होती. दुसरीकडे भारतीय संघाच्या सलामीवीर सध्या आक्रमक खेळ करत आहेत. शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सुरुवातीच्या षटकांमध्ये करत असलेली फटकेबाजी पाहून अनेक गोलंदाजांना घाम फुटला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs australia, T20 world cup