दुबई, 27 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेटने दारूण पराभव केला. बाबर आझमने (Babar Azam) 51 बॉलमध्ये नाबाद 66 रन आणि मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) 55 बॉलमध्ये नाबाद 79 रन केले, यानंतर पाकिस्तानने मंगळवारी न्यूझीलंडलाही धूळ चारली. भारताविरुद्ध सर्वाधिक रन करणाऱ्या रिझवानने न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्येही सर्वाधिक रनची खेळी केली. यानंतर मोहम्मद रिझवानने विराट कोहलीला (Virat Kohli) आणखी एक धक्का दिला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीमध्ये (ICC T20 Rankings) मोहम्मद रिझवान विराट कोहलीच्या पुढे गेला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 49 बॉलमध्ये 57 रन केले होते. या कामगिरीनंतरही विराट कोहली टी-20 बॅटरच्या यादीत चौथ्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर गेला आहे, तर केएल राहुल सहाव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात राहुल 3 रन करून आऊट झाला.
पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा तीन स्थानं फायदा झाला आहे, त्यामुळे तो चौथ्या क्रमांकावर आला आहे. रिझवानच्या टी-20 करियरमधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 40 आणि नाबाद 51 रन केले, ज्यामुळे त्याने आठ क्रमांची उडी मारत तिसरं स्थान गाठलं. मार्करमचीही ही टी-20 मधली सर्वोत्तम क्रमवारी आहे. टी-20 क्रमवारीत डेव्हिड मलान पहिल्या आणि बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
अफगाणिस्तानचा रहमनुल्लाह गुरबाज 9 स्थानं वर 12 व्या क्रमांकावर आला आहे. गुरबाजने स्कॉटलंडविरुद्ध 46 रनची खेळी केली होती. बांगलादेशचा ओपनर मोहम्मद नईमने श्रीलंकेविरुद्ध 52 बॉलमध्ये 62 रन केले, ज्यामुळे तो 11 क्रम वर 13 व्या स्थानावर आला आहे.
बॉलर्सच्या क्रमवारीत टॉप-9 मध्ये सगळे स्पिनर्स आहेत. भारताविरुद्ध 3 विकेट घेणारा शाहिन आफ्रिदी 11 क्रमांनी वर 12 व्या स्थानावर आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा पाकिस्तानचा हारिस राऊफने 34 स्थानांची उडी घेत 17 वा क्रमांक गाठला आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन ऑलराऊंडरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.