मुंबई, 2 मार्च : यंदाच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचं (ICC t-20 World Cup) भारतात आयोजन करण्यात येणार आहे. त्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून वारंवार वक्तव्य करण्यात येत आहेत. पाकिस्तानला व्हिजा मिळण्याबाबत हमी देण्यात यावी, अन्यथा स्पर्धा युएईमध्ये भरवण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख एहसान मणी (Ehsan Mani) यांनी शनिवारी केली होती. याबाबत पीसीबीने आयसीसीलाही पत्र लिहिलं होतं. पीसीबीच्या या मागणीला बीसीसीआय (BCCI) कडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख याप्रकरणात राजकारण करत आहेत. स्पर्धेसाठी भारतात येणाऱ्या खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना लगेच व्हिजा देणार असल्याचं भारत सरकारने सांगितलं आहे, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.
कोरोनाच्या संकटात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची खूप मदत केली आहे, तरीही पाकिस्तानकडून अशी वक्तव्य करण्यात येत आहेत, असं म्हणत बीसीसीआय अधिकाऱ्याने नाराजी बोलून दाखवली.
व्हिजा हमी देणं बोर्डाचं काम नाही
पाकिस्तानला भारतात स्पर्धा खेळायची नाही, म्हणून ते अशी वक्तव्य करत आहेत. व्हिजा हमी देणं कोणत्याही क्रिकेट बोर्डाचं काम नाही. हे देशाचं सरकार ठरवतं. पीसीबी प्रमुख एहसान मणी यांनी वर्ल्ड कप खेळण्यासाठी बीसीसीआयकडून व्हिजा आणि सुरक्षेची हमी मागितली आहे.
2020 सालचा टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होणार होता, पण कोरोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. आता भारतात यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा खेळवली जाईल, तर पुढच्या वर्षी पुन्हा ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.