मुंबई, 20 जानेवारी : आयसीसीने 2021 या वर्षासाठी वन-डे क्रिकेट टीम ( ICC ODI Team of The Year 2021) जाहीर केली आहे. या टीममध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. यापूर्वी बुधवारी आयसीसीने 2021 मधील टी20 टीमची घोषणा केली होती. त्यामध्येही टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला जागा मिळाली नव्हती. टी20 प्रमाणेच वन-डे टीमचं नेतृत्त्वही पाकिस्तान टीमचा कॅप्टन बाबर आझमकडे (Babar Azam) सोपवण्यात आले आहे.
आयसीसीनं जाहीर केलेल्या वन-डे टीममध्ये टीम इंडियाचा खेळाडू नसला तरी शेजारच्या देशांचा दबदबा आहे. या टीममध्ये बांगलादेशचे सर्वात जास्त 3 खेळाडू आहेत. तर पाकिस्तान आणि श्रीलंकेचे 2 खेळाडू आहेत. आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या दोन खेळाडूंचाही यामध्ये समावेश आहे. तर टीम इंडियासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचा एकही खेळाडू या टीममध्ये नाही.
IPL 2022 : आयपीएल लिलावापूर्वी इंग्लंडचा खेळाडू फॉर्मात, 36 बॉलमध्ये झळकावले शतक
बाबर आझमसाठी 2021 हे वर्ष चांगलंच यशस्वी ठरलं. या वर्षात तो वन-डे रँकिंगमध्ये विराट कोहलीला हटवून नंबर 1 वर पोहचला. त्यामुळे त्याला टीमचा कॅप्टन करण्यात आले आहे. फखर झमान हा आणखी एक पाकिस्तानी खेळाडू या टीममध्ये आहे. टीम इंडियाविरुद्धच्या पहिल्या वन-डेमध्ये शतक झळकावणारा रस्सी व्हॅन डर डुसेनचा या टीममध्ये समावेश असून जानेमन मलान हा आणखी एका दक्षिण आफ्रिकन खेळाडूची या टीममध्ये निवड झाली आहे.
बांगलादेशचे शाकिब अल हसन, मुशफिकूर रहीम आणि मुस्तफिजूर रहमान हे तीन, श्रीलंकेचे हसरंगा आणि दुष्यंता चामिरा हे दोन तर आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग आणि सिमी सिंग यांचा आयसीसीने 2021 या वर्षातील सर्वोत्तम वन-डे टीममध्ये समावेश केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.