BLOG : धोनी, ग्लोव्हज आणि राष्ट्रभक्ती : ICC ला शिव्या घालणाऱ्यांनो....

BLOG : धोनी, ग्लोव्हज आणि राष्ट्रभक्ती : ICC ला शिव्या घालणाऱ्यांनो....

धोनीच्या बलिदान ग्लोव्हजला आक्षेप घेतल्यानंतर आय़सीसीवर आगपाखड केली जात आहे. खरंच आयसीसीने काही चुकीचं म्हटलं आहे का? काय होईल धोनीनं ग्लोव्हज घातले नाही तर?

  • Share this:

वर्ल्ड कपसारखा मोठा इव्हेंट आणि कॉन्ट्रव्हर्सी नाही, विवाद नाही हे कसं शक्य आहे? त्यामुळे क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही अशाच एखाद्या विवादाची वाटच जणू काही सगळे बघत होते. महेंद्रसिंग धोनीनं ती संधी दिली. बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्हज घालून तो मैदानात उतरला आणि झाली वादाला सुरुवात. जगातली सगळी राष्ट्रभक्ती फक्त भारतीयांमध्ये आहे. त्यातही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्यांमध्ये कणभर जास्त. मग धोनी कसा ग्रेट आहे? कसा राष्ट्रभक्त आहे? याची चर्चा सुरू झाली. मग जेव्हा त्याच्या ग्लोव्हजवर आक्षेप घेण्यात आला तेव्हा तर पाकिस्ताननं आक्रमण केल्यासारखे सगळे चवताळले. हॅशटॅग वगैरे सुरू केला. आपल्या बिझी स्केड्युलमधून वेळ काढून स्मार्ट फोनवर ट्विटर ओपन करुन नेटकऱ्यांनी तो हॅशटॅग ट्रेंडीगला ठेवून आपली ही देशभक्ती, धोनी प्रेम दाखवून दिलं. इथपर्यंत सगळं ठिक होतं. पण जेव्हा आयसीसीनं धोनीला असे ग्लोव्हज घालण्याला बंदी घातली किंवा परवानगी नाकारली. मग आयसीसीविरुद्ध आगपाखड सुरू झाली. राजकारणीही यात पडले. तारेक फतेह यांनीही धोनीची बाजू घेतली. नमाज पढायला परवानगी देता मग बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्हज घालायला हरकत काय? असा भारतीयांना सुखावणारा प्रतिवाद त्यांनी केला. मग क्रिकेट मागे पडलं आणि पुन्हा एकदा देशभक्तीनं मुसंडी मारली.

आयसीसीच्या नियमांचा भंग

महेंद्रसिंग धोनीनं आयसीसीच्या नियमांचा भंग केलाय का? तर उत्तर आहे होय. जे काही आयसीसीचे नियम आहेत त्यात धोनीनं बलिदान चिन्ह अंकित केलेले ग्लोव्हज घालणं बसत नाही. त्यामुळे धोनीनं आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलंय. त्यातही आणखी एक मार्ग होता. ते ग्लोव्हज घालण्याची रितसर परवानगी धोनी मागू शकला असता. आयसीसीची परवानगी त्यानं घ्यायला हवी होती. ती मिळाली असती की नाही? माहित नाही पण धोनीनं परवानगी न घेता ग्लोव्हज घातले. त्या ग्लोव्हजवरुन वादंग झाल्यावर बीसीसीआयला जाग आली. त्यानंतर परवानगीसाठी धावपळ, आयसीसीला पत्रं लिहणं वगैरे बीसीसीआयनं केलं. पण आयसीसीनं परवानगी नाकारली.

आयसीसीचा निर्णय योग्य

धोनीला बलिदान लोगो असलेले ग्लोव्हज घालण्याला आयसीसीनं बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. आयसीसीचा निर्णय अत्यंत योग्य आहे असं मला वाटतं. देशभक्तीचा ज्वर चढलेल्यांनी एक गोष्ट समजून घ्यावी, आज धोनीनं केलं ते भारताच्या आणि भारतीयांच्या भावना सुखावणारं आहे म्हणून आपण सगळे वेड्यासारखे धोनीला सपोर्ट करतोय. पण आज धोनीला परवानगी दिली. तर उद्या दुसरे संघही परवानगी मागितील. बरं धोनीनं लष्कराचा सन्मान म्हणून ते ग्लोव्हज घातले. पण हा काही मापदंड असू शकणार नाही. म्हणजे भारतीय खेळाडूंनी लष्करच्या सन्मानासाठी बलिदान चिन्ह वापरलं. तर दुसरे खेळाडूही लष्करासाठीचं काही मागावं. बरं धोनीचा काही राजकीय किंवा वैयक्तिक स्वार्थ नव्हता हे मान्य.

...तर काय करणार?

उद्या अन्य देशातल्या राजकारण्यांनी खेळाडूंवर दबाव आणून काही राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला तर काय कराल? विचार करा उद्या एखादा पाकिस्तानचा खेळाडू बुरहान वाणी शहिद होता अशा प्रकारचा संदेश देणारं चिन्ह किंवा स्लोगन घालून मैदानात उतरला तर? मग आपल्याला तेव्हा कसं अडवणार? बुरहान वाणी आपल्यासाठी दहशतवादी असला तरी अनेकांसाठी शहीद आहे. बुरहान वाणी हा आजही अनेकांसाठी कश्मिरच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा स्वातंत्र्यवीर आहे. त्यातही पाकिस्तानमध्ये त्याला पाठिंबा होता. पाकिस्तानकडून असं काही कृत्य घडलं तर? तेव्हा पाकिस्तानी टिमला किंवा खेळाडूंना फक्त शिव्या घालता येतील. त्याशिवाय काहीही करता येणार नाही. विचार करा तो संदेश किती लोकांपर्यंत जाईल? आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो?. उद्या खेळाडू त्या- त्या देशातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या कृतीही मैदानात करतील. आणि मग आयसीसी आणि सगळ्यावरच काय परिस्थिती ओढवेलं याचा विचार करा.

वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

युक्तीवाद आणि मुर्खपणा

आता काही शहाण्या देशभक्तांनी प्रश्न उपस्थित केला की स्पॉन्सरचा लोगो चालतो मग बलिदान चिन्ह का नाही. तर स्पॉन्सरच्या लोगोला आयसीसीनं परवानगी दिलेली आहे हे पहिलं उत्तरं. मग तुम्ही म्हणाल स्पॉन्सरला परवानगी तर बलिदान चिन्हाला का नाही.

१. स्पॉन्सरचो लोगो वापरण्याची परवानगी सर्वच टिमला खेळाडूंनासुद्धा आहे.

२. स्पॉन्सर आणि पैसा हा कुठल्याही खेळासाठी तो खेळ वाढवण्यासाठी, जगवण्यासाठी , खेळाडूंसाठी गरजेचा आहे. पैसा म्हटलं की आपण नैतिकतेचा आव आणून स्पॉन्सरच्या लोगोच समर्थन करणाऱ्या आयसीसीला किंवा कुणालाही शिव्या घालू शकतो. पण स्पॉन्सर शिवाय वर्ल्ड कप किंवा इतर स्पर्धांचं आयोजन करणं शक्य नाही.

३. अनेक उदयोन्मुख खेळाडूंना त्यांच्या कठिण काळात स्पॉन्सर तारतात. त्यांच्या प्रशिक्षणावर , किटवर, रहाण्यावर आरोग्यावर खर्च करतात. जेव्हा त्या खेळाडूला कुणीही ओळखत नसतं. तेव्हा त्यांच्यातले गुण बघून स्पॉन्सर मदत करतात. काही खेळाडू पुढे येतात काही येत नाही. पण अनेक खेळाडूंच्या जडणघडणीत त्याला लागणारी आर्थिक मदत अशाच कुठल्यातरी स्पॉन्सरकडून येते.

४. पाकिस्तानसारख्या अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या देशांमध्ये स्पॉन्सरच्या जोरावर क्रिकेट तग धरून आहे. त्याला सरकारी मदत फारशी मिळत नाही. त्या मोबदल्यात स्पॉन्सर फक्त त्याच्या नावाचा किंवा लोगो वापरण्याची मागणी करतो.

५. पाकिस्तानच नव्हे बांगलादेश, श्रीलंका इतकचं कशाला अफगाणिस्तानसारख्या देशांमध्ये क्रिकेटला सरकार मदत करू शकत नाही. त्यासाठी कॉर्पोरेटची मदत गरजेची आहे.

६. फुटबॉल असो की क्रिकेट सगळीकडे स्पॉन्सरचे लोगो वापरण्याची परवानगी आहे. आणि आवर्जून नमूद करावसं वाटत की, फुटबॉलमध्येही अशा प्रकारचे चिन्ह वापरण्यावर बंदी आहे. तिथे तर आनंद कसा साजरा करावा. याचीही नियमावली तयार करण्यात आली आहे. टी-शर्ट काढण्यावर देखील फुटबॉलमध्ये बंदी घालण्यात आलीये.

बावळटपणाचा कळस

सध्या आपल्या देशात देशभक्तीचा ज्वर इतकं आहे की, कुणाला काही सांगायला गेलं आणि त्याला नाही पटलं, की बचाव एकच तुम्ही देशद्रोही आहात किंवा भारतीय म्हणून घ्यायला नालायक आहात. असा शिक्का मारून मोकळे होतात. असाच ज्वर चढलेल्या लोकांनी भारतीय संघानं वर्ल्ड कपवर बहिष्कार घेलण्याची मागणी करून आपण किती बावळट, तद्दन मूर्ख आहोत याचा आणखी एक पुरावा दिला. ट्विटर किंवा फेसबुकर एक कमेंट टाकायला डोकं (वापरायचं की नाही हे प्रत्येकावर अवलंबून आहे.) आणि मेहनत दोन्ही लागत नाही.

वर्ल्ड कप खेळण्यासाठी चार वर्षांची वाट बघावी लागते.मेहनत ,कामगिरीतलं सातत्य राखणं, अनेक आव्हानांना तोंड देत, तावून- सुलाखून निघाल्यावर, क्रिकेचपटूची संघात वर्णी लागते. क्रिकेटमधल्या सर्वात मोठ्या स्पर्धेसाठी प्रत्येक क्रिकेटर मेहनत घेतो. पण अशी मागणी करणाऱ्यांनी खेळाडूंचा आणि या गोष्टींचा विचार केला नाही.

किंबहुना क्रिकेटर खेळणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न असतं ते वर्ल्ड कप खेळण्याचं. वर्ल्ड कपच्या संघाचा भाग असण्याचं. वर्ल्ड कप जिंकण्याचं. वर्ल्ड कप आपल्या देशासाठी, आपल्या फॅन्ससाठी मिळवण्याचं. पण बहिष्कार घालण्याची मागणी करणाऱ्या कुणालाही याचं काहीही पडलेलं नाही. धोनीला पाठिंबा देणं म्हणजे देशभक्ती आणि आणि धोनीनं बलिदान चिन्ह अंकित केलेले ग्लोव्हज घालणे म्हणजे देशप्रेम असं समिकरण करून ठेवलंय. यामध्ये क्रिकेट आणि क्रिकेटर मागे पडले.

आयसीसीला शिव्या घालणाऱ्यांनो....

डोळ्यांवर देशभक्तीची पट्टी बांधलेल्या मित्रांनो. आयसीसीला शिव्या घालण्या अगोदर हे लक्षात ठेवा. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय संघ शहीद जवानांना आदरांजली म्हणून लष्करी रंगाची टोपी घालून मैदानात उतरला होता आणि त्याला आयसीसीनं परवानगी दिली होती. भारतीय टीमनं आपल्या जवानांप्रती दाखवलेल्या आदरावर आयसीसीनं आक्षेप घेतला नव्हता. तेव्हा या प्रसंगाचीही सगळ्यांनी आठवण ठेवावी.

शेवटी...

मित्रांनो, मैदान मग ते क्रिकेटचं असो की फुटबॉलचं ते खेळासाठी चर्चेत आलं पाहिजे आणि खेळासाठीच चर्चेत राहिलं पाहिजे. धोनीच्या ग्लोव्हजवर बलिदान चिन्ह आहे की नाही? यावरुन त्याची राष्ट्रभक्ती, देशप्रेम ठरवता येणार नाही. पुढच्या सामन्यात तो बलिदान चिन्ह नसलेले ग्लोव्हज घालून उतरला तर त्याची देशभक्ती कमी होईल का? धोनीच्या ग्लोव्हजवर कुठलं चिन्ह अंकित केलंय? यापेक्षा महत्वाचं आहे ते, ग्लोव्हज घालून धोनी कॅच पकडतो की नाही? धोनी स्टंपिंग करतो की नाही? मोक्याच्या वेळी रन आऊट करतो का नाही ?

वाचा-धोनीच्या मुद्द्यावरून पाकिस्तानात रणकंदन ; ‘तो क्रिकेट खेळायला गेला आहे, महाभारतासाठी नाही'

सगळ्या ज्वर चढलेल्या देशभक्तांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे. समजा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात धोनी बलिदानं चिन्ह अंकित केलेले ग्लोव्हज घालून उतरला. आणि त्याच्याकडू कॅच सुटली तर चालणार आहे का तुम्हाला ? अरे जावू द्या! काय होतं कॅच सुटली तर ? अरे जावू द्या काय झालं ? स्टंपिंग मिस झालं तर... पण त्याचं देशप्रेम बघा ! त्याच्या ग्लोव्हजवरच बलिदान चिन्ह बघा ! असं म्हणणार आहोत का आपणं? तर उत्तरं आहे नाही. त्याच्या चुकीनं जर मॅच हरलो तर याच ट्विटरवर त्याला शिव्यांची लाखोली वाहली जाईल. म्हणूनच मित्रांनो धोनीनं स्टंपच्या मागे उभा राहून टीम इंडियाला जिंकून देणं महत्वाचं आहे. आपण त्याच्या खेळामुळे त्याचे फॅन आहोत. देशभक्तीमुळे नाही. आणि तो कुठले ग्लोव्हज घालून मैदानात उतरतो यामुळे तर नाहीच नाही. मित्रांनो क्रिकेटच्या मैदानात क्रिकेट बघूया ! क्रिकेट खेळू या. आणि पाकिस्तानला हरवल्यानंतर घसा जाम होईपर्यंत ओरडू या...भारत माता की जय !

वाचा- #DhoniKeepTheGlove : ‘पाकिस्तानच्या खेळाडूंचा नमाज चालतो, मग धोनीचे ग्लोव्ह्ज का नाही’ ; चाहते संतापले

(या लेखातील व्यक्त झालेले विचार लेखकाचे वैयक्तिक मत असून न्यूज18 लोकमत त्याच्याशी सहमत असेलच असे नाही.)

SPECIAL REPORT : धोनीच्या ग्लोव्ह्जवरून का पेटला वाद, आयसीसीचा काय आहे आक्षेप?

First published: June 8, 2019, 5:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading