मुंबई, 12 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतानं आपली विजयी घौडदौड सुरु केली. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला धुळ चारल्यानंतर विराटसेनेचं लक्ष्य आता न्यूझीलंडचा संघ आहे. मात्र, या सामन्याआधी भारताला मोठा धक्का बसला. भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन याच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळं तीन आठवडे तो महत्त्वाच्या सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळं धवन ऐवजी कोणाला संधी मिळावी, याची चर्चा सध्या रंगली आहे. यातच आता ऋषभ पंतला धवनच्या जागी धाडण्यात आले आहे. मात्र भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनी वेगळ्याच खेळाडूला पसंती दिली आहे.
शिखर धवनच्या 117 धावांच्या शतकी खेळीमुळं भारताच्या सलामीची चिंता मिटली असे वाटत असताना, धवनच्या दुखापतीमुळं भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळं त्याच्या जागी सलामीसाठी केएल राहुलला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळं तिसऱ्या क्रमांकासाठी विजय शंकर, अंबाती रायडू आणि ऋषभ पंत यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता भारतीय क्रिकेट संघाला पहिल्यांदा विश्वचषक जिंकवून देणाऱ्या कपिल देव यांनी शिखर धवनच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी देण्याची मागणी केली आहे.
कपिल यांनी, “शिखर धवनच्या जागेवर जर कोणाला संधी द्यायची असले तर, त्यासाठी अजिंक्य रहाणेच्या नावाचा विचार होण्यास काहीच हरकत नाही आहे. पंत आणि रायुडूच्या तुलनेत अजिंक्यची संघात निवड व्हायला हवी. अजिंक्यकडे मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. तो सलामीला फलंदाजीला येऊ शकतो, तसेच त्याच्याकडे मधल्या फळीत फलंदाजी करण्याचाही अनुभव आहे.” असे कपिल देव यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितले. अंजिक्य रहाणे सध्या काऊंटी क्रिकेट खेळत आहे. तर, त्यानं 16 महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरोधात अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यामुळं आता सध्या तरी, ऋषभ पंतला संधी देण्यात आली असली तरी धवनची दुखापत गंभीर असल्यास रहाणेला संधी मिळण्याची आशा नाकारता येत नाही.
ऑस्ट्रेलियाविरोधात धवन झाला होता जखमी
ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात फलंदाजी करत असताना शिखर धवनच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. जलद गोलंदाज कुल्टर नाईलचा चेंडू धवनच्या अंगठ्याला लागला होता.त्यामुळं त्याला दुसऱ्या इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करता आले नाही. याच सामन्यात धवननं 117 धावांची खेळी केली होती. त्यामुळं धवनची कमी विराटला जाणवणार आहे.
वाचा- ठरलं! ‘हा’ खेळाडू घेणार शिखर धवनची जागा, विराटला मोठा दिलासा
वाचा- World Cup : सलामीला केएल राहुल तर धवनच्या जागी 'हा' खेळाडू मिळवून देणार विजय?
वाचा- वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी चाहत्यांना मोठा धक्का
SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची 'गब्बर' जागा?