नॉटिंगहम, 03 मे : पाकिस्तानने दिलेलं 349 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा दोन खेळाडूंच्या शतकानंतरही पराभव झाला. इंग्लंडच्या बाजूने झुकलेल्या सामन्यात पाकिस्तानने पुनरागमन केलं आणि धक्कादायक निकालाची नोंद केली.पाकिस्तानला 349 धावांत रोखल्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला 50 षटकांत 9 बाद 334 धावा करता आल्या. पाकिस्तानने 14 धावांनी विजय मिळवून वर्ल़्डकप आधी झालेल्या मालिकेतील पराभवाचा बदला घेतला.
पाकिस्तानच्या शादाब खानने इंग्लंडला दुसऱ्याच षटकात पहिला दणका दिला. जेसन रॉयला पायचित केलं. त्यानंतर 9 व्या षटकात वहाब रियाजने जॉनी बेअरस्टोला बाद करून इंग्लंडला आणखी अडचणीत आणलं. त्यावेळी इंग्लंडच्या 2 बाद 60 धावा झाल्या होत्या. त्यानतंर कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जो रूटने 30 धावांची भागिदारी केली. या दोघांची जोडी मोहम्मद हाफीजने फोडली. मॉर्गनचा त्रिफळा उडवून इंग्लंडला तिसरा धक्का दिला. त्यानंतर बेन स्टोक्सही लगेच बाद झाला. त्याला शोएब मलिकनं त्याला सर्फराज अहमदकरवी झेलबाद केलं.
इंग्लंडच्या 4 बाद 118 धावा झाल्या असताना जो रूट आणि जोस बटलर यांनी 130 धावांची भागिदारी केली. या भागिदारीने सामना इंग्लंडच्या बाजूने झुकला. जो रूट 107 धावांवर बाद झाला. त्यानंतर बटलरने मोईन अलीच्या साथीने संघाला 300 धावां करून दिल्या. संघाला 60 धावा हव्या असताना बटलरसुद्धा बाद झाला. त्याने 76 चेंडूत 103 धावा केल्या. त्यानंतर तळातील फलंदाज लागोपाठ बाद होत गेले.
तत्पूर्वी, वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागलेल्या पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 348 धावा केल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोंलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीला मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 14 षटकांत 82 धावा केल्या. त्यानतंर 15 व्या षटकात मोईन अलीच्या गोलंदाजीव फखर जमान यष्टीचित झाला. त्याने 40 चेंडूत 36 धावा केल्या. त्यानंतर 21 व्या षटकात मोईन अलीनेच इमाम उल हकला बाद केलं. इमामने 58 चेंडूत 44 धावा केल्या.
पहिल्या दोन विकेट गमावल्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद हाफीज यांनी 88 धावांची भागिदारी केली. या दोघांची जोडी मोईन अलीने फोडली. बाबर आझम 66 चेंडूत 63 धावा काढून बाद झाला. त्यावेळी संघाच्या 3 बाद 199 धावा झाल्या होत्या. बाबर बाद झाल्यानंतर हाफीज आणि कर्णधार सर्फराज अहमदने 80 धावांची भागिदारी केली. मोहम्मद हाफीजला बाद करून मार्क वूडने पाकिस्तानला चौथा धक्का दिला. हाफीजने 84 धावा केल्या. 46 व्या षटकात पाकिस्तानच्या 300 धावा झाल्या. कर्णधार सर्फराज अहमदने 43 चेंडूत 55 धावांची वेगवान खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
वाचा- World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल
वाचा- World Cup : विराट कोहलीचा मोठा खुलासा, टीममधला ‘हा’ खेळाडू आहे माझ्या विरोधात
वाचा- World Cup : केएल राहुलच्या अडचणी वाढल्या, चौथ्या क्रमांकाचा ‘हा’ दावेदार झाला फिट
VIDEO : दोन दिवसांत वादळासह पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, पाहा 'टॉप 18 बातम्या'