कार्डिफ, 08 जून : ICC Cricket World Cup इंग्लंडने दिलेल्या 387 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 280 धावांपर्यंत मजल मारू शकला. इंग्लडने हा सामना 106 धावांनी जिंकून वर्ल्ड कपमधील दुसरा विजय साजरा केला. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने एकाकी झुंज दिली. त्याने 119 चेंडूत 121 धावा केल्या. मुश्फिकर रहिमने 44 धावा काढून त्याला साथ दिली. बांगलादेशचा सलामीवीर सौम्या सरकार केवळ दोन धावांवर बाद झाला. जोफ्रा आर्चरने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर मार्क वूडच्या गोलंदाजीवर तमिम इक्बाल झेलबाद झाला. शाकिब अल हसन आणि मुश्फिकर रहिम यांनी शतकी भागिदारी करून डाव सावरला. रहिमला बाज करून प्लंकेटनं ही जोडी फोडली. त्यानंतर आदील राशिदच्या गोलंदाजीवर मोहम्मद मिथून बाद झाला.त्यानंतर बांगलादेशचे फलंदाज लागोपाठ बाद होत गेले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 3 तर आर्चर आणि मार्क वूड यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून बांगलादेशनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लडने जेसन रॉयच्या दीडशतकी आणि बटलर, बेअरस्टो यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 50 षटकांत 386 धावा केल्या. सलामीच्या जोडीने शतकी भागिदारी केली. अर्धशतक पूर्ण होताच मुर्तझाच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टो बाद झाला. त्यानंतर सैफुद्दीनच्या गोलंदाजीवर जो रूट अवघ्या 21 धावांवर बाद झाला. त्याने गेल्या सामन्यात शतक केलं होतं. रूटनंतर जेसन रॉय 121 चेंडूत 153 धावा करून बाद झाला. त्यानंतर जोस बटलरने 44 चेंडूत 64 धावांची वेहवान खेळी केली. त्याने कर्णधार इयॉन म़ॉर्गनसोबत चांगली भागिदारी केली. इयॉन मॉर्गन 35 धावांवर बाद झाला.
बांगलादेशने संघात कोणताही बदल केला नाही. तर इंग्लंडने मोइन अलीच्या जागी लियाम प्लंकेटला संघात घेतलं. 2015 मध्ये अॅडलेडच्या मैदानावर इंग्लंडला बांगलादेशनं 15 धावांनी पराभूत केलं होतं. यामुळे त्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली होती. यंदा इंग्लंडला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
VIDEO : मन्नत पूर्ण, आदित्य ठाकरे पोहोचले अजमेरच्या दर्ग्यात!