ओव्हल, 03 जून : बांगलादेशने वर्ल्ड कपच्या त्यांच्या पहिल्याच सामन्यात आपण लंबी रेस का घोडा असल्याचं दाखवून दिलं आहे. ओव्हलवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 21 धावांनी पराभूत करून इतर संघांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.
नाणेफेक जिंकून आफ्रिकेनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला बांगलादेशच्या गोलंदाजांनी फोल ठरवलं. बांगलादेशच्या सलामीवीरांनी 60 धावांची भागिदारी केली. त्यानंतर मधल्या फळीतील शाकिब अल हसन आणि मुश्फिकर रहिम यांच्या 142 धावांच्या भागिदारीने संघाला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. त्यांच्यानंतर तळाच्या फलंदाजांनीसुद्धा चांगली कामगिरी करून संघाच्या धावसंख्येत भर घातली. मोहमदुल्लाहने केलेल्या 33 चेंडूत 46 धावांनी बांगलादेशला 330 धावांचे आव्हान ठेवता आले.
आफ्रिकेच्या गोलंदाजांनी साफ निराशा केली. कसिगो राबाडाला एकही बळी घेता आला नाही. त्याच्या दहा षटकांत 57 धावा कुटल्या. ख्रिस मोरिसने 2 बळी घेतले असले तरी तो सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकांत तब्बल 73 धावा दिल्या. पेहलुक्वायोनं 52 तर इम्रान ताहिरने 57 धावा दिल्या. दोघांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
बांगलादेशच्या फलंदाजीसमोर आफ्रिकेनं 7 गोलंदाज वापरले तरीही त्यांना धावगती रोखण्यात यश आलं नाही. यातच त्यांचा क्षेत्ररक्षणातील ढिसाळपणाही पराभवाला कारणीभूत ठरला. त्याशिवाय गोलंदाजांनी अवांतर धावांची खैरात केली. एकट्या रबाडाने सर्वाधिक 7 वाइड बॉल टाकले. बांगलादेशने एकूण 21 अवांतर धावा दिल्या. यात 12 वाइड तर 9 लेग बायच्या धावांचा समावेश होता.
बांगलादेशनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात संथ झाली. त्यांच्या सलामीच्या जोडीला बांगलादेशच्या गोलंदाजांनी फटकेबाजीची संधी दिली नाही. आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि मार्करम यांच्यातील समन्वयाच्या अभावाने धावबाद होण्याची वेळ आली.
आफ्रिकेची पहिली विकेट गेल्यानंतर मधल्या फळीतील खेळाडूंनी चांगला खेळ केला. मात्र, मोक्याच्या क्षणी डेव्हिड मिलर झेलबाद झाला आणि त्यानंतर सामन्याचं चित्र बदललं. मिलर बाद झाल्यानंतर दुसेननं फटकेबादी करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही. त्यानंतर आवश्यक धावगती वाढल्याने फलंदाजांवर दबाव आला. यातच लागोपाठ विकेटही आफ्रिकेनं गमावल्या.
Click Here : प्रेमासाठी पाकिस्तान ते दक्षिण आफ्रिका, क्रिकेटपटूची अनोखी प्रेमकहाणी
बांगलादेशच्या गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावताना मुस्तफिझुर रहमानने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. इतर गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. मेहिदी हसनने 10 षटकात फक्त 44 धावा देत 1 विकेट घेतली. तर मोहम्मद सैफुद्दीनने 57 धावा देत 2 गडी तंबूत धाडले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी 14 धावा अवांतर दिल्या.फलंदाजांच्या कामगिरीनंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी धावांचा बचाव करताना योग्य मारा केला.
आफ्रिकेला त्यांचा स्टार खेळाडू हाशिम आमला संघात नसल्याचाही फटका बसला. तर दुसरीकडे बांगलादेशचे खेळाडू आजारी असतानाही त्यांनी जबरदस्त सांघिक कामगिरी केली. कागदावर मजबूत असलेल्या आफ्रिकेच्या संघाला प्रत्यक्ष मैदानावर मात्र चांगला खेळ करता आला नाही. त्यातही ओव्हलवर आफ्रिकेचं रेकॉर्ड चांगलं नाही. त्यांना गेल्या 8 सामन्यात या मैदानावर फक्त एकदा विजय मिळवता आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत त्यांनी 2017 मध्ये विजय मिळवला होता.
SEE VIDEO : कुणी असं बाद होऊ नये, आफ्रिकेच्या सलामीवीरांचा गोंधळ
बांगलादेशचा सलामीचा खेळाडू तमीम इकबाल जखमी असल्यामुळं सराव सामन्यात खेळू शकला नव्हता. याआधी सराव सामन्यात कर्णधार मशरफे मुर्तजा स्नायुच्या आजारानं त्रस्त होता. तर, मुस्ताफिजूर रहमान आणि महामदुल्लाहसुद्धा फिट नव्हते.
दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच त्यांच्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत झाली आहे. तर याआधी बांगलादेशकडून त्यांना 2007 च्या वर्ल्ड कपमध्येही पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. वर्ल्ड कपमध्ये आशियाई संघांतील बांगलादेश असा एकमेव संघ आहे ज्यांनी आफ्रिकेला दोन वेळा पराभूत केलं आहे. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी आफ्रिकेला वर्ल्ड कपमध्ये फक्त एकदाच हरवलं आहे.
Click Here : पॉर्न साइटला प्रमोट करण्यासाठी घुसली मैदानात, थांबवावा लागला सामना
VIDEO: मुंबईकरांच्या खिशाला कात्री, टॅक्सीचं भाडं वाढणार, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी