पुणे, 26 मार्च : मागच्या 6 महिन्यांमध्ये टीम इंडियाच्या (Team India) नवोदितांनी ऐतिहासिक कामगिरी केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात तसंच इंग्लंडचा घरच्या मैदानात पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयाचे शिल्पकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसणारे युवा खेळाडूच होते. शुभमन गिल, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, टी.नटराजन, मोहम्मद सिराज यांनी ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला, तर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी पदार्पणातच धमाका केला.
एकीकडे टीम इंडियात नुकतीच संधी मिळेलेले खेळाडू आपली प्रतिभा दाखवत असताना अनुभवी असलेले कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) मात्र संघर्ष करताना दिसत आहेत. धोनीच्या (MS Dhoni) निवृत्तीनंतर या दोन्ही स्पिनरच्या कामगिरीत कमालीची घसरण झाली आहे, त्यामुळे आता या दोघांवर टीम इंडियातून गच्छंतीची टांगती तलवार आहे.
धक्कादायक आकडेवारी
धोनी टीममध्ये असताना कुलदीप यादवने 47 मॅचमध्ये 22.53 ची सरासरी आणि 27.8 च्या स्ट्राईक रेटने 91 विकेट घेतल्या. तर चहलने धोनी असताना 46 मॅचमध्ये 25.32 ची सरासरी आणि 30.7 च्या स्ट्राईक रेटने 81 विकेट घेण्यात यश मिळवलं.
धोनीच्या निवृत्तीनंतर मात्र या दोघांच्या कामगिरीने निच्चांक गाठला आहे. कुलदीपने धोनीच्या निवृत्तीनंतर खेळलेल्या 16 मॅचमध्ये 61.71 च्या सरासरीने आणि 9.6 च्या स्ट्राईक रेटने 14 विकेट घेतल्या, तर याच कालावधीमध्ये चहलने 8 मॅचमध्ये 41.82 च्या सरासरीने 36.9 च्या स्ट्राईक रेटने 11 विकेट मिळवल्या. धोनी टीममध्ये असताना कुलदीपचा इकोनॉमी रेट 4.87 होता, तर धोनीनंतर हीच आकडेवारी 6.22 झाली. दुसरीकडे चहलचा इकोनॉमी रेट धोनी असताना 4.95 तर धोनीच्या निवृत्तीनंतर 6.80 झाला.
फोटो सौजन्य : क्रिकबझ
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये कुलदीपने 10 ओव्हर बॉलिंग करून 84 रन दिल्या, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. तर पहिल्या वनडेमध्ये त्याने 9 ओव्हर टाकून 68 रन दिल्या, तेव्हाही त्याला विकेट घेण्यात यश आलं नाही.
2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर अश्विन आणि जडेजा यांना टीमबाहेर करण्यात आलं. त्यानंतर या दोघांच्याऐवजी कुलदीप आणि चहलला संधी देण्यात आली. कुलदीप आणि चहलच्या या जोडीने टीम इंडियामध्ये पदार्पण करत धमाका केला. वनडे क्रिकेटच्या मधल्या ओव्हरमध्ये या जोडीने विरोधी टीमच्या खोऱ्याने विकेट घेतल्या. या विकेट घेण्यात खेळपट्टी मागून धोनीची मदत मिळत असल्याचं दोघांनी अनेकवेळा सांगितलं, पण आता धोनी निवृत्त झाल्यानंतर या दोघांचं करियरच धोक्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Kuldeep yadav, MS Dhoni, Team india, Yuzvendra Chahal