मुंबई, 14 डिसेंबर: दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) जायबंदी झाल्याने टेस्ट सीरिजसाठी त्याच्या जागी प्रियांक पांचाळ (Priyank Panchal) याची निवड करण्यात आली. त्यानंतर क्रिकेट जगतात प्रियांक पांचाळची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याने ट्विट करत सर्वांचे आभार मानले आहेत.
रोहित शर्माला मुंबईमध्ये नेट प्रॅक्टिस करताना मांडीच्या मांसपेशींना दुखापत झाली, त्यामुळे रोहितऐवजी प्रियांक पांचाळ याची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. प्रियांक पांचाळ हा भारतीय ए टीमचा कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध त्याने नुकतीच 96 रनची खेळी केली होती.
या निवडीनंतर, ''भारताची जर्सी घालण्याची संधी मिळाल्याने मला गौरवण्यात आले आहे. असे वाटत आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद बीसीसीआय. आपल्या सर्व शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार. सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहे!''
तसेच, ''मला आनंद आहे की, कठोर परिश्रम आणि चिकाटीने दक्षिण आफ्रिकेचे तिकीट मिळाले. फक्त 3 दिवसांपूर्वी, मी दक्षिण आफ्रिकेतून भारत-अ दौरा करून मायदेशी परतलो होतो. मी माझे सामानही नीट उघडले नाही आणि तेवढ्यात मला मोठी संधी मिळाली.'' अशी भावना टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना व्यक्त केली.
प्रियांक पांचाळ पुढे म्हणाला, “गेल्या काही वर्षांपासून मी गुजरात आणि भारत-अ संघांसाठी चांगली कामगिरी करत आहे आणि मी अनेक वर्षांपासून या संधीची वाट पाहत होतो. पण मला या संधीची अपेक्षा नव्हती. हे एक सुखद आश्चर्य आहे."
यासोबतच तो म्हणाला, “जेव्हा मी इतक्या धावा करत होतो, तेव्हा संधी न मिळाल्याने थोडे निराश होणे स्वाभाविक आहे. तथापि, माझे व्यक्तिमत्त्व असे आहे की मला नेहमी प्रश्न पडतो की, आता एक फलंदाज म्हणून मी काय गमावत आहे? जर मला भारतासाठी खेळायचे असेल तर मी अधिक प्रभावशाली होण्यासाठी काय करावे? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या खेळाची गरज आहे? मला आनंद आहे की माझी मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्ती अखेर फळाला आली आहे.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma