हिमाचं सहावं सुवर्ण, जागतिक स्पर्धेत पात्रतेसाठी अखेरची संधी!

हिमाचं सहावं सुवर्ण, जागतिक स्पर्धेत पात्रतेसाठी अखेरची संधी!

2 जुलैपासून हिमा दासनं आतापर्यंत सहा सुवर्णपदकं पटकावली. मात्र तिला जागतिक स्पर्धेचे पात्रता निकष पूर्ण करता आलेला नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : गेल्या महिन्यात लागोपाठ 5 सुवर्ण जिंकणारी भारताची धावपटू हिमा दासने झेक प्रजासत्ताक इथं झालेल्या स्पर्धेत आणखी एक सुवर्णपदक पटकावलं. अॅथलेटिक मिंटिक रेयटर या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 300 मीटर धावण्याच्या शर्यतीत महिलांमध्ये हिमा दास आणि पुरुषांमध्ये भारताच्याच मोहम्मद अनासनं सुवर्णपदक पटकावलं. गेल्या दोन महिन्यातील हिमाचं हे सहावं सुवर्णपदक आहे.

याआधी हिमानं शेवटचं सुवर्णपदक 400 मीटर शर्यतीत जिंकलं होतं. झेक प्रजासत्ताकमधील नोव्हे मेस्टो इथं झालेल्या स्पर्धेत तीनं 52.09 सेकंदाची वेळ नोंदवत हिमानं सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. सहावं सुवर्ण जिंकल्यानंतर हिमा दासने ट्विट केलं. त्यात तिनं झेक प्रजासत्ताक इथंल्या अॅथलेटिक मिंटिक रेयटर स्पर्धेत 300 मीटर शर्यतीत पहिलं स्थान मिळवलं असं म्हटलं आहे.

हिमाने पोलंडमध्ये पोजनान अॅथलेटिक्स ग्रांप्रीमध्ये 23.65 सेकंदाची वेळ नोंदवली होती. त्यानंतर कुंटो अॅथलेटिक्समध्येसुद्धा तिने आपली कामगिरी कायम राखली. 8 जुलैला झालेल्या स्पर्धेत हिमाने 23.97 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत सुवर्ण पदकावर नावं कोरंल होतं. त्यानंतर क्लांदो मेमोरियल अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमानं 200 मीटर प्रकारात तिसरं सुवर्ण पटकावलं. हिमानं 200 मीटर अंतर 23.43 सेकंदात पार केलं. वर्ल्ड ज्यूनिअर चॅम्पियन असलेल्या आणि 400 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नावावर असणाऱ्या हिमाची सर्वोत्तम वेळ 23.10 इतकी आहे. गेल्याच वर्षी तिनं ही वेळ नोंदवली होती. गेल्या वर्षभरापासून हिमा पाठदुखीने त्रस्त आहे. त्यातही तिने जबरदस्त कमबॅक करत आपली कामगिरी उंचावली आहे.

झेक रिपब्लिकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या हंगामातील तिची सर्वोत्तम वेळ ठरली आहे. 2 जुलै रोजी तिनं पहिलं सुवर्ण पटकावलं. त्यानंतर सुवर्णपदकांचा धडाका तिनं कायम ठेवला आहे. यावर्षी तिला पाठदुखीमुळं आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं.

सलग सहा सुवर्ण पदकं पटकावल्यानंतरही हिमाला सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद अॅथलेटीक्स स्पर्धेत 400 मीटर शर्यतीसाठी पात्र होता आलेलं नाही. मोहम्मद अनास मात्र पात्र ठरला आहे.

जागतिक स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी 400 मीटर धावण्याच्या शर्यतीचे निकष हिमा दासला अद्याप पूर्ण करता आलेले नाहीत. 400 मीटरमध्ये 51.80 सेकंद तर 200 मीटरमध्ये 23.02 सेकंद वेळ नोंदवावी लागते. सहा सुवर्ण पदक पटकावलेल्या हिमाने सहापैकी चार स्पर्धेत 200 मीटर मध्ये 23.25 सेकंदाची सर्वोत्तम वेळ नोंदवली आहे. दोहा इथं होणाऱ्या या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी तिच्याकडं 5 सप्टेंबरला अखेरची संधी असेल. त्यासाठी दिल्लीत इंडियन ग्रां. प्रि, अॅथलेटिक्स स्पर्धेत 400 मीटरमध्ये तिला सर्वोत्तम कामगिरी नोंदवावी लागेल.

महापुरात छतावर अडकलेल्या बकऱ्यांची सुटका, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Hima Das
First Published: Aug 19, 2019 01:14 PM IST

ताज्या बातम्या