हिमाला कार चालकानं अर्ध्या रस्त्यात खाली उतरवलं होतं, शर्यतीत हरवून घेतला होता बदला

हिमाला कार चालकानं अर्ध्या रस्त्यात खाली उतरवलं होतं, शर्यतीत हरवून घेतला होता बदला

भारताची सुवर्णकन्या हिमा दासचं सोनेरी यश दिसत असलं तरी त्यामागे तिच्या कष्टाची आणि संघर्षाची कहाणी आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जुलै : भारताची धावपटू हिमा दासने गेल्या 19 दिवसांत पाचवं सुवर्ण पदक पटकावलं आहे. पाठीच्या दुखापतीशी लढत तिने हे सुवर्ण यश मिळवलं आहे. पाठदुखीमुळे तिला आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं. सध्या हिमाचं ही सोनेरी घोडदौड दिसत असली तरी तिच्या इथपर्यंतच्या प्रवासाची कहाणी मात्र संघर्षाने भरलेली आहे. अगदी जेव्हा तिनं भारतासाठी पहिलं जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचं सुवर्ण पटकावलं तरी तिचा संघर्ष संपला नव्हता. त्यावेळी गुगलवर हिमा दासची जात शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. आसाममधील एका लहानशा गावातून आलेल्या हिमाने आपल्या वेगाच्या जोरावर जग जिंकलं आहे. हिमानं धावण्याच्या करिअरची सुरुवात उशीरानेच केली. हिमा जेव्हा शर्यतीसाठी ट्रॅकवर उतरली तेव्हा तिच्याकडे चांगले स्पोर्ट शूज नव्हते. आज त्याच हिमाच्या नावाचा ब्रॅण्ड झाला आहे.

आसाममधील एका खेड्यात आणि शेतकरी कुटुंबात हिमाचा जन्म झाला. तिचे वडील रंजीत दास यांच्याकडे केवळ दोन एकर जमिन आहे. त्यावरच सहाजणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. तिला स्पर्धेसाठी चांगले बुट घेऊन देणेही घरच्यांना शक्य नव्हते. हिमाला गुवाहाटीला पाठवण्याबाबत प्रशिक्षकांनी वडिलांना विचारले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा नकार दिला होता. मात्र, प्रशिक्षकांनी हिमा काय कमाल करु शकते हे ओळखले होते. निपुन दास यांनी हिमाच्या वडिलांना पटवून दिले आणि शेतात फुटबॉल खेळणाऱ्या हिमाने घेतलेली भरारीने हिमालयाची उंची गाठली.

ढिंग एक्स्प्रेस अशी ओळख असलेली हिमा लहानपणी शेतात वडिलांसोबत फुटबॉल खेळायची. त्यावेळी गावात असलेल्या प्रशिक्षकांनी तिच्यातील धावण्याची प्रतिभा ओळखली आणि अॅथलेटिक्समध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यावेळी हिमाच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. आंतरजिल्हा स्पर्धेसाठी तिने स्वस्तातले बूट घातले होते. त्यात 100 आणि 200 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं होतं. अॅथलिटिक्समध्ये येणं हिमासाठी सोपं नव्हतं. त्यासाठी कुटुंबाला सोडून 140 किलोमीटर दूर रहावं लागलं. त्यानंतर तिची सोनेरी वाटचाल सुरु झाली. तेव्हा प्रशिक्षक निपुन दास यांनी गुवाहटीला प्रशिक्षणासाठी पाठवले. त्यानंतर हिमाने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तिच्या वेगाची एक्स्प्रेस जागतिक पातळीवर धावायला सुरुवात झाली.

2014 मध्ये शालेय स्पर्धेत तिनं चमक दाखवली होती. त्यानंतर तालुका, जिल्हा स्तरावर स्पर्धा गाजवल्या. तिचे प्रशिक्षक निपुन दास आणि नवोजित कौर यांनी तिच्या वेगावर विश्वास ठेवला. त्यांनी 2017 मध्ये नैरोबीत झालेल्या यूथ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत हिमाला सहभागी होण्यासाठी स्वत: कर्ज काढलं. हिमाने 2018 मध्ये जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण पहिल्या 35 सेकंदात ती पहिल्या तीनमध्येही नव्हती. मात्र, त्यांनतर तिने वेग वाढवत सर्वांनाच मागे टाकले आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर देशाचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले तेव्हा भावनिक झालेल्या हिमाला तिचे अश्रू रोखता आले नव्हते.

वर्ल्ड ज्युनिअर अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकल्यानंतर न्यूज 18 शी बोलताना हिमाने एक किस्सा सांगितला होता. शाळेला जात असताना गावात एका व्यक्तीने कार आणली होती. तेव्हा त्या व्यक्तीनं आम्हाला शाळेत सोडतो म्हणून सांगितलं आणि गाडीने अर्ध्या वाटेत उतरवलं. तेव्हा ही गोष्ट मनाला लागली. त्यानंतर गाडीसोबत 100 मीटरची शर्यत लावून गाडीला मागे टाकलं होतं.

जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना ती म्हणाली होती की, मला कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव आहे. कशा पद्धतीने संघर्ष करावा लागला हे माहिती आहे. मला माझ्या आई-वडिलांसाठी आणि देशासाठी काहीतरी करायचे आहे. आतापर्यंतचा प्रवास हा एखाद्या स्वप्नासारखाच आहे.

आतापर्यंत वर्ल्ड ज्युनिअर अॅथलेटिक्समध्ये भारताला तीनच पदके मिळवता आली आहेत. यामध्ये सीमा पुनिया, नवजीत कौर धिल्लन यांना थाळीफेकमध्ये कांस्यपदक तर भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. धावपटू म्हणून सुवर्णपदक मिळवणारी पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये ती एकमेव आहे. फ्लाइंग सिख मिल्खा सिंग आणि सुवर्णकन्या पी.टी. उषा यांनाही अशी कामगिरी करता आली नव्हती.

2018 नंतर यावर्षी हिमाला दुखापतीने आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होता आलं नव्हतं. 2019 मध्ये पहिल्यांदाच तिनं जुलै महिन्यातील 2 तारखेला ट्रॅकवर पाऊल ठेवलं आणि पहिलं सुवर्ण जिंकलं. त्यानंतर गेल्या 19 दिवसांत 200 मीटरमध्ये 4 आणि 400 मीटरमध्ये 1 सुवर्णपदक पटकावलं. या यशानंतरही तिनं आपली मातीशी नाळ कायम राखली आहे. स्पर्धेदरम्यान आसामला महापुराचा तडाखा बसल्याचं तिला समजलं. तेव्हा आपलं वेतन तिनं पुरग्रस्तांसाठी दिलं आणि इतरांना मदतीचे आवाहनही केलं.

सांगलीच्या 'गज्या'ने मालकाला केलं कर्जातून मुक्त!

First published: July 21, 2019, 12:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading