दिसपूर, 17 जुलै : भारताची धावपटू हिमा दासने दोन आठवड्यात तीन सुवर्ण पदकं जिंकून शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तिच्या या कामगिरीचा अभिमान प्रत्येक भारतीयाला आहे. पण आता तिनं पुरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या मदतीनं हा अभिमान आणखी वाढला आहे. हिमा दासनं आसाममधील पुरग्रस्तांसाठी तिचं अर्ध वेतन दिलं आहे. याशिवाय पुरग्रस्तांना मदत करा असं आवाहनही केलं आहे.
आसाममध्ये पुरस्थिती बिकट असून जवळपास 50 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. यासाठी हिमाने इंडियन ऑईलकडून मिळणाऱ्या वेतनातील अर्धी रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत दिली आहे. हिमा दास इंडियन ऑइलमध्ये एचआर अधिकारी आहे.
Flood situation in our state Assam is very critical, 30 out of 33 districts are currently affected. So i would like to request big corporates and individuals to kindly come forward and help our state in this difficult situation. pic.twitter.com/cbVZv7b4IP
— Hima MON JAI (@HimaDas8) July 16, 2019
हिमा दासने ट्वीट करून सांगितलं आहे की, कार्पोरेट कंपन्यांनी पुढं येऊन राज्यातील लोकांना मदत करा. आसाममधील परिस्थिती कठीण आहे. पुरामुळे 30 जिल्ह्यांना फटका बसला आहे. दरवर्षी अशी अवस्था असते. आतापर्यंत 35 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक गावांत पाणी शिरलं आहे.
I have contributed my bit and requesting others also to please help people of Assam. #AssamFloods https://t.co/y7ml1EMGzG
— Hima MON JAI (@HimaDas8) July 16, 2019
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तिथलं जनजीवन विस्कळीत झालं असून महापूर आणि जमिन खचल्याच्या घटना घडल्या आहेत. आसाममध्ये एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 4 हजार 175 गावातील जवळपास 50 लाख लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरग्रस्तांच्या मदतीला एनडीआरएफची पथके कार्यरत आहेत.
Let your dreams be bigger than your fears and your actions be louder than your words. pic.twitter.com/M4RqC3XL4Q
— Hima MON JAI (@HimaDas8) July 15, 2019
हिमा दासने जुलै महिन्याच्या सुरुवातीला 2019 या वर्षातील पहिली स्पर्धा जिंकत सुवर्ण पदक पटकावलं होतं. तिनं पोलंडमध्ये पोजनान अॅथलेटिक्स ग्रांप्रीमध्ये 23.65 सेकंदाची वेळ नोंदवली होती. त्यानंतर कुंटो अॅथलेटिक्समध्येसुद्धा तिने आपली कामगिरी कायम राखली. 8 जुलैला झालेल्या स्पर्धेत हिमाने 23.97 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत सुवर्ण पदकावर नावं कोरंल होतं. त्यानंतर क्लांदो मेमोरियल अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमानं 200 मीटर प्रकारात तिसरं सुवर्ण पटकावलं. हिमानं 200 मीटर अंतर 23.43 सेकंदात पार केलं.
वर्ल्ड ज्यूनिअर चॅम्पियन असलेल्या आणि 400 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नावावर असणाऱ्या हिमाची सर्वोत्तम वेळ 23.10 इतकी आहे. गेल्याच वर्षी तिनं ही वेळ नोंदवली होती. गेल्या वर्षभरापासून हिमा पाठदुखीने त्रस्त आहे. त्यातही तिने जबरदस्त कमबॅक करत आपली कामगिरी उंचावली आहे.
काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड