नवी दिल्ली, 1 मे : भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने (Corona Virus) थैमान घातलं आहे. संपूर्ण देशात कोरोनाविरुद्ध लढाई लढत असताना आता सेलिब्रिटीही पुढे आल्या आहेत. भारतामध्ये दिवसाला जवळपास 3 लाख नवे रुग्ण आढळत आहेत, तर अडीच हजारांच्या घरात लोकांचा मृत्यू होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनचीही कमतरता जाणवत आहे. या कठीण परिस्थितीमध्ये टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मदतीसाठी पुढे आला आहे. हार्दिकने भारताच्या ग्रामीण भागात 200 ऑक्सिजन कॉनसनट्रेटर दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएलमध्ये (IPL 2021) चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या (CSK vs MI) मॅचआधी बोलताना हार्दिक म्हणाला, 'देशातली जनता कठीण परिस्थितीमध्ये आहे, हे आम्हाला माहिती आहे. मेडिकल स्टाफ आणि फ्रन्ट लाईन वर्कर्स कठीण काळात पुढे येऊन कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत, त्यांचे धन्यवाद. मी, कृणाल, माझी आई आणि माझं संपूर्ण कुटुंब गरजूंना मदत करण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग शोधत आहोत.'
'आम्ही देशाच्या ग्रामीण भागात 200 ऑक्सिजन कॉनसनट्रेटर दान देण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य यंत्रणांना जास्त मदत करण्याची गरज आहे. हे खूप कठीण आहे, पण गरजूंसाठी कोणीतरी प्रार्थना करत आहे, त्यांना हे सांगितलं पाहिजे,' असं हार्दिकने सांगितलं.
शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) यांनीही त्यांच्या आयपीएल मानधनातली काही रक्कम कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ऑक्सिजन कॉनसनट्रेटरसाठी 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) मिशन वायूसाठी 30 ऑक्सिजन कॉनसनट्रेटर दिले आहेत. एमसीसीआयए म्हणजेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रिकल्चरच्या मिशन वायू मोहिमेला पाठिंबा म्हणून रहाणेने ही मदत केली आहे. अजिंक्यने दिलेले हे 30 ऑक्सिजन कॉनसनट्रेटर महाराष्ट्रात जिकडे कोरोनाचा कहर जास्त आहे, अशा जिल्ह्यांमध्ये पाठवले जाणार आहेत.
भारतीय खेळाडूंप्रमाणेच परदेशी क्रिकेटपटूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सने (Pat Cummins) पीएम केयर फंडमध्ये 37 लाख रुपयांची तर ब्रेट लीने (Brett Lee) एक बिटकॉईन म्हणजेच जवळपास 42 लाख रुपये दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Cricket, Hardik pandya, IPL 2021