मुंबई, 16 नोव्हेंबर : टीम इंडियाचा (Team India) ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अडचणीत येताना दिसत आहे. खराब फॉर्ममुळे हार्दिक पांड्या याला टीम इंडियातून वगळण्यात आले. त्यानंतर आता मुंबई विमानतळावर त्याच्याकडून 5 कोटींची दोन घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. कस्टम विभागाने ही जप्तीची कारवाई केली आहे. हार्दीक पांड्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियासोबत यूएईमध्ये होता. तेथून परतत असताना मुंबई विमानतळावर कस्ट विभागाने ही कारवाई केली आहे. (Customs Department Mumbai seized 5 crore rupees watches from Hardik Pandya)
न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, यूएईमधून मुंबईत परतलेल्या हार्दिक पांड्या याला कस्टम विभागाने थांबवले आणि त्याच्याकडून दोन महागडी घड्याळे जप्त केली आहेत. या दोन घड्याळांची किंमत 5 कोटी रुपये इतकी आहे. हार्दिक पांड्या याने कस्टम विभागाला या घड्याळांची माहिती दिली नव्हती आणि त्या घड्याळांची बिल ही हार्दिक पांड्या याच्याकडे नव्हती अशी माहिती समोर आली आहे.
यापूर्वी कृणाल पांड्याही अडकला होता वादात
भारतीय ऑलराऊंडर पांड्या घड्याळांचा खूपच शौकीन आहे हे सर्वांनाच माहिती आहे. त्याच्याकडे Phillippe Nautilus Platinum 5711 घड्याळासह दुर्मिळ आणि महागड्या ब्रँडमधील अनेक घड्याळ आहेत. गेल्यावर्षी हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पांड्याही अशाच प्रकरणात अडकला होता. त्याने सीमाशुल्क विभागाला महागड्या घड्याळांची माहिती दिली नव्हती आणि त्यानंतर त्याच्याकडील घड्याळे जप्त करण्यात आली होती.
वाचा : एक आलिशान बंगला येईल इतक्या किमतीचं हार्दिक पांड्याच्या हातातील घड्याळ
हार्दिकला टीम इंडियातून डच्चू
टी-20 वर्ल्ड कप 2021 हा हार्दिक पांड्यासाठी खास नव्हता. या वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या आपलं चांगलं प्रदर्शन दाखवू शकला नाही. खराब फॉर्मुळे हार्दिक पांड्या याला न्यूझीलंड विरुद्धच्या तीन टी-20 मॅचेसच्या सीरीजमधून टीम इंडियातून वगळण्यात आले. टी-20 वर्ल्डकपमध्ये हार्दिक पांड्या याने 3 इनिंगमध्ये केवळ 69 रन्स केले. न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजसाठी हार्दिक पांड्या ऐवजी टीम इंडियात व्यंकटेश अय्यर याचा समावेश करण्यात आला आहे.
आधीच खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून वगळण्यात आलेल्या हार्दिक पांड्या याच्यावर आता मुंबई विमानतळावर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडील 5 कोटींची दोन घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे हार्दिक पांड्या चांगलाच अडचणीत सापडला आहे. आता हार्दिक पांड्याला टीम इंडियात पुन्हा जागा मिळवायची असेल तर त्याला आपला परफॉर्मन्स सुधारावा लागेल हे निश्चित. हार्दिक पांड्याने स्थानिक क्रिकेटमध्ये आपला दमदार परफॉर्मन्स दाखवला तर त्याला टीम इंडियात पुन्हा संधी नक्कीच मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hardik pandya, Mumbai, Sports, Team india