पुणे, 07 जुलै : कॅप्टन कूल, फिनिशर, हेलिकॉप्टर शॉट हे शब्द जरी कानावर पडले तरी एकच चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा. आपल्या नेतृत्वाखाली भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या धोनीचा आज 39वा वाढदिवस. क्रिकेट चाहत्यांसाठी धोनी म्हणजे एक आशा आणि युवा खेळाडूंसाठी धोनी म्हणजे एक प्रेरणास्थान. धोनीमुळे भारताला अनेक चांगले युवा खेळाडू मिळाले. त्यातलाच एक म्हणजे पुणेकर केदार जाधव.
केदार जाधवनं खूप उशीरा क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मात्र धोनीला त्याला कायम साथ दिली. आज धोनीच्या वाढदिवसानिमित्त केदारनं आपल्या माही भाईसाठी एक खास पत्र लिहिले. या पत्रातून त्यानं धोनी विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
केदार जाधवनं या पत्रात, क्रिकेट कसं खेळायचं यासोबत आयुष्य कसं जगायचं हेही तुम्ही शिकवलत अशा भावना व्यक्त केल्या. केदार जावधनं आपल्या पत्रात धोनीला समुद्रातील लाइटहाऊस म्हटलं आहे. "ज्याप्रमाणे लाइटहाऊस दिशा दाखवण्याचं काम करत, दिशा दाखवताना उजेड देतं, लाटाही झेलतं, अगदी तुमच्यासारखं! तुम्ही कित्येकांना आनंदाचे क्षण दिले, दिशा दाखवली, टीका होत असताना खंबीरपणे उभे राहिलात", अशा भावना जाधवनं व्यक्त केल्या.
फक्त केदारचं नाही तर भारतीय क्रिकेट संघाच्या इतर खेळाडूंनीही धोनीला खास शुभेच्छा दिल्या. धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील सहकारी ब्राव्होने तर धोनीच्या वाढदिवसानिमित्त खास गाणं तयार केलं. Helicopter 7 हे गाणं ब्राव्होनं खास धोनीसाठी तयार केले आहे.
लॉकडाऊन असल्यामुळं नेहमी संघासोबत वाढदिवस साजरा करणारा धोनी आज आपल्या कुटुंबासोबत असेल. तर धोनीचे चाहते मात्र त्याला पुन्हा मैदानावर खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
संपादन-प्रियांका गावडे.