Home /News /sport /

Happy Birthday : ऑस्ट्रेलियात विजय, लॉर्ड्सवर शतक, बॉम्बे डक, हे विक्रम आगरकरचेच

Happy Birthday : ऑस्ट्रेलियात विजय, लॉर्ड्सवर शतक, बॉम्बे डक, हे विक्रम आगरकरचेच

भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकर (Ajit Agarkar) याचा आज वाढदिवस आहे. ऑस्ट्रेलियातल्या ऍडलेड टेस्टमधला ऐतिहासिक विजय, लॉर्ड्सवर शतक आणि बॉम्बे डक म्हणून मिळालेलं नाव. अजित आगरकरची क्रिकेट कारकिर्द असंख्य चढ उतारांनी भरून होती.

    मुंबई, 4 डिसेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकर (Ajit Agarkar) याचा आज वाढदिवस आहे. ऑस्ट्रेलियातल्या ऍडलेड टेस्टमधला ऐतिहासिक विजय, लॉर्ड्सवर शतक आणि बॉम्बे डक म्हणून मिळालेलं नाव. अजित आगरकरची क्रिकेट कारकिर्द असंख्य चढ उतारांनी भरून होती. 1998 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अजित आगरकर याने भारतासाठी 191 वनडे, 26 टेस्ट आणि 4 टी-20 मॅच खेळल्या. वनडे क्रिकेटमध्ये अजित आगरकर हा भारताचा तिसरा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. ऍडलेडमधली ऐतिहासिक कामगिरी 2003-04 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या ऍडलेडमधल्या दुसऱ्या टेस्टमध्ये रिकी पॉण्टिंगच्या 242 रनच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 556 रन केले. यानंतर भारतानेही राहुल द्रविड आणि लक्ष्मणच्या अफाट खेळीमुळे 523 रनपर्यंत मजल मारली. द्रविडने पहिल्या इनिंगमध्ये 233 आणि लक्ष्मणने 148 रन केले. यानंतर पुन्हा बॅटिंगला आलेल्या ऑस्ट्रेलियाला आगरकरने दणका दिला. त्याने घेतलेल्या 6 विकेटमुळे ऑस्ट्रेलियाचा 196 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे भारताने 230 रनचं आव्हान 4 विकेट राखून पूर्ण केलं. पहिल्या इनिंगमध्येही आगरकरने 2 विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या इनिंगमधल्या 6 विकेट ही आगरकरची टेस्ट क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी होती. लॉर्ड्सवर शतक लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात जी कामगिरी सचिन तेंडुलकरला करता आली नाही, ती अजित आगरकरने केली आहे. 2002 सालच्या दौऱ्यात पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने 487 रन केले, यानंतर भारताचा फक्त 221 रनवर ऑलआऊट झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडने 301 रनवर डाव घोषित केला, त्यामुळे भारताला 568 रनचं अशक्य आव्हान मिळालं. भारताचा या मॅचमध्ये 170 रनने पराभव झाला असला तरी आगरकरने नाबाद 109 रनची खेळी केली. भारताकडून सगळ्यात जलद अर्धशतक भारताकडून वनडेमध्ये सगळ्यात जलद अर्धशतक करण्याचा विक्रमही आगरकरच्याच नावावर आहे. आगरकरने झिम्बाब्वेविरुद्ध 21 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. आगरकरने 25 बॉलमध्ये नाबाद 67 रन केले, यामध्ये 7 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. याच मॅचमध्ये त्याने 2 विकेटही घेतल्या होत्या, ज्यामुळे भारताचा विजय झाला होता. भारताकडून सगळ्यात जलद 50 विकेट अजित आगरकरने वनडेमध्ये भारताकडून सगळ्यात जलद 50 विकेट घेण्याचा विक्रमही केला आहे. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये 2008 पर्यंत आगरकरच्याच नावावर हा विक्रम होता, पण अजंता मेंडिस याने 19 मॅचमध्ये 50 विकेटचा टप्पा गाठला. आगरकरने 23 मॅचमध्ये 50 विकेट घेतल्या होत्या. बॉम्बे डक नावाने ओळख ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगरकरच्या नावावर एका खराब रेकॉर्डचीही नोंद आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्टमध्ये आगरकर लागोपाठ 7 वेळा शून्य रनवर आऊट झाला. मुंबईचा असल्यामुळे आगरकरला बॉम्बे डक म्हणूनही बोललं गेलं. आगरकर होणार निवड समिती अध्यक्ष? भारताच्या निवड समितीसाठीची पश्चिम विभागाची जागा खाली झाल्यामुळे अजित आगरकरने निवड समिती सदस्य होण्यासाठी अर्ज केला आहे. अजित आगरकर जर निवड समिती सदस्य झाला तर त्याला अध्यक्षपदाचीही जबाबदारी मिळेल. बीसीसीआयच्या नियमांनुसार निवड समितीमधल्या ज्या खेळाडूने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या असतील, त्याची निवड समिती अध्यक्षपदी निवड होते. सध्या सुनिल जोशी यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव जास्त असल्यामुळे ते निवड समितीचे अध्यक्ष आहेत, पण जर आगरकर निवड समितीमध्ये आला तर सुनिल जोशी यांना हे पद आगरकर यांना द्यावं लागेल. मग सुनिल जोशी हे फक्त निवड समिती सदस्य राहतील.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या