चेन्नई, 30 डिसेंबर : गौतम गंभीर याच्यानंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भारताचे माजी लेग स्पिनर लक्ष्मण शिवरामाकृष्णन (Laxman Shivramakrishnan) यांनी भाजप (BJP)ची वाट धरली आहे. पुढच्या वर्षी तामीळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवरामाकृष्णन पक्षाला मजबूत करण्याचं काम करणार आहेत. शिवरामाकृष्णन यांनी भाजपचे राष्ट्रीय सचिव सीटी रवी आणि तामीळनाडू भाजप अध्यक्ष एल मुरुगन यांच्या उपस्थितीमध्ये चेन्नईत भाजपमध्ये प्रवेश केला.
17 व्या वर्षी लक्ष्मण शिवरामाकृष्ण यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या टेस्ट कारकिर्दीची सुरूवात केली होती. भारताकडून त्यांनी 9 टेस्ट, 26 वनडेमध्ये 15 विकेट घेतल्या होत्या. शिवरामाकृष्णन यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फक्त चार वर्षच चालली.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 76 मॅच खेळून 154 विकेट घेतल्या. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर शिवरामाकृष्णन यांनी कॉमेंट्रीही केली.
गांगुलीच्याही भाजप प्रवेशाच्या चर्चा
दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीदेखील भाजपमध्ये प्रवेश करेल, अशा चर्चा सुरू आहेत. काहीच दिवसांपूर्वी सौरव गांगुलीने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची राजभवनात जाऊन भेट घेतली होती. ही भेट औपचारिक भेट असून राज्यपालांना ईडन गार्डन मैदानात बोलावण्याचं आमंत्रण देण्यासाठी गेल्याचं गांगुलीने सांगितलं. दीड तास गांगुली आणि पश्चिम बंगालच्या राज्यपालांमध्ये चर्चा झाली.