मुंबई, 15 फेब्रुवारी : टीम इंडियाचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंहला (Yuvraj Singh) इन्स्टाग्रामवरील (Instagram) एका लाईव्ह कार्यक्रमात युजवेंद्र चहलबद्दल केलेलं विधान भोवलं आहे. युवराज सिंहवर या प्रकरणात IPC आणि SC/ST कायद्यामधील 153, 153 A, 295, 505 कलमाच्या अंतर्गत FIR दाखल करण्यात आली आहे. युवराजच्या विरोधात हरयणातील हिसारमध्ये FIR दाखल करण्यात आली असून यामध्ये त्याच्यावर दलित समाजाचा अपमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
युवराज सिंह 1 जून 2020 रोजी एका लाईव्ह कार्यक्रमात रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत सहभागी झाला होता. या कार्यक्रमात त्यानं युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) बद्दल अपनानजक भाषा वापरली होती. युवराजचं ते वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं होतं. 2 जून रोजी हरियाणातील हांसी पोलीस स्टेशनमध्ये युवराजच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.
एससी/एसटी अॅक्टमधील संशोधन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकारच्या तक्रारीनंतर खटला दाखल झाल्यानंतर चौकशी करावी लागते. युवराजच्या प्रकरणात पोलिसांनी खटला दाखल न करता प्राथमिक तपास सुरू केला, असा दावा काही दिवसांपूर्वी याचिकाकर्त्यानं केला होता. त्यानंतर आता युवराजवर FIR दाखल करण्यात आली आहे.
( वाचा : IND vs ENG : रोहित शर्मानं भर मैदानात लगावली ऋषभ पंतला थप्पड, पाहा VIDEO )
युवराजनं मागितली होती माफी!
युवराज सिंहचं ‘ते’ विधान व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र जोरदार प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर युवराज सिंहनं सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून या विषयावर माफी देखील मागितली होती. ‘माझा कोणत्याही प्रकारच्या असमानतेवर विश्वास नाही. धर्म, रंग, पंथ आणि लिंग याच्या आधारे मी कधीही भेदभाव केलेला नाही. लोकांचं कल्याण करण्यासाठी मी झटत आलो असून सर्वांचा आदर करतो.
माझ्या मित्राशी बोलण्यातील विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. हा वाद अनाठायी होता. मी नकळत कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो,’ असं युवराजनं म्हंटलं होतं. युवराजच्या या स्पष्टीकरणानंतरही याचिकाकर्त्याचं समाधान झालं नाही. त्यामुळेच त्याच्यावर अखेर FIR दाखल करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.