मुंबई, 1 मार्च : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ल्यूक पॉमर्सबॅक (Luke Pomersbach) पुढच्या अडचणी निवृत्तीनंतरही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. ड्रग्ज आणि चोरीच्या आरोपाखाली पॉमर्सबॅकला पोलिसांनी अटक केली आहे. ल्यूकवर याचवर्षी 24 जानेवारी ते 16 फेब्रुवारीदरम्यान दक्षिण पर्थ, स्कारबरो आणि वूडलॅण्ड्स या भागात ज्वेलरी, गोल्फचं सामान चोरल्याचा आरोप झाला होता. याशिवाय त्याच्यावर ड्रग्जच्या धंद्यामध्ये सामील असल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. पण मागच्या आठवड्यात त्याला पर्थच्या एका न्यायालयाने जामीन दिला होता, पण पाच हजार डॉलर न भरल्यामुळे पॉमर्सबॅकला जामीन मिळाला नाही.
ल्यूक पॉमर्सबॅकने ऑस्ट्रेलियासाठी फक्त एक टी-20 मॅच खेळली ती न्यूझीलंडविरुद्ध. पॉमर्सबॅकच्या या एकमेव मॅचची कहाणीही रंजक आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या मॅचमध्ये ब्रॅड हॉग खेळणार होता. पण मॅचच्या काहीवेळ आधी त्याला दुखापत झाली. ही मॅच पाहण्यासाठी पॉमर्सबॅक स्टेडियममध्ये आला होता, पार्किंगमध्ये गाडी लावत असतानाच त्याला आपण मॅच खेळणार असल्याचं समजलं. त्यावेळी तो वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळायचा. पॉर्मसबॅकने न्यूझीलंडविरुद्धच्या या मॅचमध्ये 7 बॉल खेळून 15 रन केले. ऑस्ट्रेलियाने ही मॅचही जिंकली, पण पॉमर्सबॅकला पुन्हा संधी मिळाली नाही.
आयपीएलमध्ये (IPL) पॉमर्सबॅक दोन टीमकडून खेळला. 2018 ते 2013 या कालावधीमध्ये तो पंजाबच्या (KXIP) आणि बँगलोरच्या (RCB) टीममध्ये होता. या काळात त्याने 122 च्या स्ट्राईक रेटने 302 रन केले होते. आयपीएलमध्येही पॉमर्सबॅक वादात अडकला होता. आयपीएलदरम्यान एका अमेरिकन महिला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत हाणामारी केल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पॉमर्सबॅकला ताब्यातही घेतलं होतं. पॉमर्सबॅक ब्रिस्बेन हिटकडून खेळताना त्याने बिग बॅश लीगही जिंकली होती. 2014 साली मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचं सांगत त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Crime news