काबूल, 19 ऑगस्ट : अफगाणिस्तानवर तालिबानने (Taliban Captures Afghanistan) कब्जा केल्यानंतर तिथली परिस्थिती चिंताजनक बनली आहे. तालिबानी शासकांची भीती आता तिथल्या खेळाडूंनीही घेतली आहे. आपल्या सुरक्षेसाठी सोशल मीडियावरंच आपलं अकाऊंट डिलीट करा, किट जाळून टाका आणि स्वत:चं अस्तित्व मिटवा, असं आवाहन अफगाणिस्तानच्या महिला फूटबॉल टीमची माजी कर्णधार खलिदा पोपलने (Khalida Popal) केलं आहे. भूतकाळात दहशतवाद्यांनी हत्या घडवून आणल्या, महिलांवर बलात्कार केले, त्यामुळे आता महिला फूटबॉलपटू आपल्या भविष्याबाबत घाबरल्या आहेत, असं खलिदा रॉयटर्सशी बोलताना म्हणाली आहे.
अफगाण महिला फूटबॉल लीगची सहसंस्थापक असलेली खलिदा पोपल महिला सक्षमीकरणाबाबत कायमच भूमिका मांडत आली आहे, पण यावेळी मात्र तिने वेगळाच संदेश दिला आहे. 'स्वत:च्या सुरक्षेसाठी सोशल मीडिया अकाऊंट डिलीट करा, आपली ओळखच मिटवून टाका, राष्ट्रीय टीमची जर्सीही जाळून टाका,' असं खलिदाने रॉयटर्सशी बोलताना सांगितलं.
Afghanistan's former women's soccer captain Khalida Popal told @Reuters she has urged players to delete their social media accounts, erase public identities and burn their kits for safety's sake after the Taliban seized control of the country https://t.co/VqlioYGGt0 pic.twitter.com/MZ0Ziyzna8
— Reuters (@Reuters) August 19, 2021
'माझ्यासाठी हे खूप त्रासदायक आहे. राष्ट्रीय महिला खेळाडू म्हणून ओळख मिळवण्यासाठी मला झटावं लागलं. छातीवर देशाचा झेंडा घेऊन खेळण्यासाठी मी लढले. फूटबॉल हे आंदोलन म्हणून उभं राहिलं. 1996-2001 दरम्यान तालिबानने महिलांना काम करण्यापासून रोखलं, त्यामुळे आता महिला घाबरल्या आहेत,' अशी प्रतिक्रिया खलिदाने दिली.
'फक्त खेळाडूच नाही तर आंदोलकही घाबरले आहेत. सुरक्षा मागण्यासाठीही आता कोणाकडे जायचं, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. आपण देश कोसळत असल्याचं पाहत आहोत. कधीही आपला दरवाजा ठोठावला जाईल, अशी भीती त्यांच्या मनात आहे,' असं खलिदा म्हणाली.
फूटबॉलमुळे अफगाणी महिला त्यांच्या अधिकारांसाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या, असं वक्तव्यही खलिदाने केलं. जागतिक फूटबॉल संघटना अफगाणिस्तानमधल्या वातावरणामुळे चिंतेत आहे, असं फिफाच्या प्रवक्त्याने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Football, Taliban