नुंबई, 19 डिसेंबर : गतविजेता फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील फिफा वर्ल्ड कपचा अंतिम सामना अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक असा झाला. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटला, त्यानंतर अतिरिक्त वेळेतही गोल बरोबरीत असल्याने पेनल्टी शूटआऊटवर सामन्याचा निकाल लागला. यात अर्जेंटिनाने 4-2 अशा गोल फरकाने विजय मिळवत तिसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. मेस्सीचं स्वप्न साकार झालं असलं तरी दुसऱ्या बाजूला फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेच्या कामगिरीचं कौतुक फुटबॉल चाहते करत आहेत. फायनलमध्ये हॅट्ट्रिक करून त्याने अनेक विक्रम नावावर नोंदवले. तसंच त्याने गोल्डन बूटही जिंकला.
फर्स्ट हाफनंतर सेकंड हाफमध्येही फ्रान्सला गोल करायला संधी मिळत नव्हती. पण 78 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या निकोलस ओटामेंडीने पेनल्टी बॉक्समध्ये फाउल केल्यानं फ्रान्सला पेनल्टी मिळाली. या पेनल्टीवर एम्बाप्पेने 80 व्या मिनिटाला गोल केला. या गोलचा आनंदही एम्बाप्पेनं साजरा केला नाही. पण त्यानंतर अवघ्या 97 सेकंदात एम्बाप्पेने गोल केला आणि जोरदार जल्लोष केला.
हेही वाचा : FIFA Final : 'सर्वात थरारक सामना', पंतप्रधान मोदींनी केलं अर्जेंटिनाच्या खेळाचं कौतुक
अतिरिक्त वेळेत सामना गेल्यानंतर दुसऱ्या एक्स्ट्रा टाइममध्ये मेस्सीने गोल केला. पण त्यानंतर 118 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून एम्बाप्पेने पुन्हा सामना बरोबरीत केला. या गोलसह एम्बाप्पेने फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गोलची हॅट्ट्रिक केली. अशी कामगिरी करणारा तो फक्त दुसरा खेळाडू आहे. 1966 मध्ये इंग्लंडच्या ज्योफ हर्स्ट यांनी हॅट्ट्रिक केली होती.
एम्बाप्पेने यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये 8 गोल केले. यासह त्याने गोल्डन बूटही जिंकला. फिफा वर्ल्ड कपच्या 14 सामन्यात त्याचे आता 12 गोल झाले असून ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनीही 14 सामन्यात 12 गोल केले होते. सध्या सक्रीय असलेल्या खेळाडूंमध्ये मेस्सीचे वर्ल्ड कपमध्ये जास्त 13 गोल आहेत. पण मेस्सीला यासाठी 26 सामने खेळावे लागले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: FIFA, FIFA World Cup