Home /News /sport /

मुलांचा चेहरा आठवला आणि मृत्यूला माघारी पाठवले, अग्नितांडवातून वाचलेल्या F1 ड्रायव्हरने सांगितला थरारक अनुभव!

मुलांचा चेहरा आठवला आणि मृत्यूला माघारी पाठवले, अग्नितांडवातून वाचलेल्या F1 ड्रायव्हरने सांगितला थरारक अनुभव!

फ्रान्सचा (France) F1 ड्रायव्हर रोमन ग्रोसजेन (Romain Grosjean) च्या कारला अपघात झाला होता. मुलांच्या आठवणीमुळेच मृत्यूला परतवण्याची हिंमत झाल्याची भावना रोमनने बोलून दाखवली आहे.

    पॅरीस, 6 डिसेंबर: बहरीन ग्रँड प्रिक्स (Bahrain Grand Prix) स्पर्धेची आठवडाभरापूर्वी सुरुवात मोठी धक्कादायक झाली. या स्पर्धेत सहभागी झालेला फ्रान्सचा (France)  F1 ड्रायव्हर रोमन ग्रोसजेन (Romain Grosjean) च्या कारला अपघात झाला होता. या कारने अगदी काही क्षणात पेट घेतल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका क्षणभर चुकला. या अपघातामुळे स्पर्धा तातडीने थांबवण्यात आली. सुदैवाची बाब म्हणजे रोमन या अपघातामधून बचावला. या जीवघेण्या अपघाताला एक आठवडा झाल्यानंतर रोमनने प्रथमच तो अनुभव जाहीर सांगितला आहे. रोमननी ‘स्काय स्पोर्ट्स’ला दिलेल्या मुलाखातीमध्ये त्याच्या जीवावर बेतलेल्या त्या प्रसंगाबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. “कारचा अपघात झाल्यानंतर मी जगण्याच्या आशा जवळपास सोडल्या होत्या. त्याचवेळी माझ्या डोळ्यासमोर मुलांचा चेहरा आला. मुलांचा चेहरा दिसतात मला जगण्याची प्रेरणा मिळाली. कारमधून बाहेर पडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचे मी ठरवले’’, असे रोमनने सांगितले. रोमनचा थरारक अनुभव “मी डोळे उघडले, सीटबेल्ट काढला आणि कारमधून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या हॅल्मेटच्या वरच्या भागाला काही तरी लागले होते. त्यामुळे मी थोडावेळ शांत बसलो. कुणी मदतीला येण्याची मी वाट पाहत होतो. त्यावेळी मी माझ्या दोन्ही बाजूंना पाहिलं. तेंव्हा सर्वत्र नारिंगी दिसत होते. मला क्षणभर सूर्यास्त झाल्याचा भास झाला. पण त्यानंतर तो प्रकाश सर्किटमधून येत असल्याचं माझ्या लक्षात आलं. गाडीला आग लागली होती. त्यामुळे आता मदतीला कुणी येईपर्यंत थांबणे अशक्य असल्याची मला जाणीव झाली,’’ या शब्दात रोमनने त्या प्रसंगाची आठवण सांगितली आहे. ‘मृत्यूची चाहूल लागली होती’ ‘’कारमधून बाहेर पडण्याचे प्रयत्न यशस्वी होत नव्हते त्यावेळी मला माझा आवडता F1 ड्रायव्हर निकी आठवला. मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते प्रयत्न यशस्वी होत नव्हते. त्यानंतर एक क्षण असा आली की माझे सर्व अवयव काम करण्याचं थांबले. मला मृत्यूची चाहूल लागली होती. त्याचवेळी अचानक मला माझ्या तीन मुलांची आठवण आली. मला मुलांसाठी जगायचं होतं, याच भावनेतून मी पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि जीव वाचवण्यात यशस्वी झालो’’, असा थरारक अनुभव रोमनने स्काय स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Fire

    पुढील बातम्या