मेलबर्न, 19 जानेवारी: भारतासारख्या देशात अनेक वेळा नियमांपेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळेच की काय व्हीआयपी किंवा लोकप्रिय व्यक्तींना नियमांतून सुट दिली जाते. पण परदेशात मात्र व्यक्तींपेक्षा नियमांना अधिक महत्त्व दिले जाते. अशाच एका घटनेच्या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
सध्या ऑस्ट्रेलियन ओपनचा फिव्हर सुरु आहे. टेनिसमधील महान खेळाडू रॉजर फेडरर ओळखपत्रा शिवाय स्पर्धेच्या ठिकाणी पोहचला. तेव्हा त्याला सुरक्षा कर्मचाऱ्याने थांबवले आणि ओळखपत्राची मागणी केली. संबंधित कर्मचाऱ्याने ओळखपत्र असल्याशिवाय तुम्हाला आत सोडता येणार नाही, असे सांगितले. यावर फेडररने सुरक्षा कर्मचाऱ्याशी वाद न घालता तेथेच थांबणे पसंत केले. काही वेळातच फेडररच्या टीममधील एक सदस्य त्याचे कार्ड घेऊन आला. त्यानंतर त्याला आत जाण्याची परवानगी दिली.
ऑस्ट्रेलियन ओपनची 6 विजेतेपदे आणि सर्वाधिक ग्रॅड स्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या फेडररला कोणत्याही ओळखपत्राची गरज नाही. पण सुरक्षा कर्मचाऱ्याने ओळखपत्राची मागणी केली, जी नियमानुसार योग्य होती. त्या कर्मचाऱ्याने ओळखपत्रासाठी थांबवने हे फेडररसाठी देखील अनपेक्षित असावे. तरी नियमांचा आणि त्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा सन्मान ठेवत फेडरर तेथे थांबला. त्यानंतर कार्ड दाखवल्यानंतर तो आत गेला.
सुरक्षा कर्मचाऱ्यांने फेडररला रोखल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेट युझर्स या घटनेवर सुरक्षा कर्मचारी आणि फेडरर या दोघांचे कौतुक करत आहेत.
Even @rogerfederer needs his accreditation 😂#AusOpen (via @Eurosport_UK)
— #AusOpen (@AustralianOpen) January 19, 2019
pic.twitter.com/oZETUaygSE
भारतात अनेक वेळा लोकप्रिय व्यक्तींची लोकप्रियता हेच त्यांचे ओळखपत्र मानले जाते. अशा व्यक्तींना अनेक वेळा नियमांमधून सूट दिली जाते. या लोकांकडून सुरक्षा कर्मचारी ओळखपत्र देखील मागत नाहीत आणि त्यांना दिली जाणारी ही स्पेशल सुट सर्वसामान्य नागरिक देखील ग्रहीत धरतात.
VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालवला चक्क रणगाडा