Home /News /sport /

'कोडेड सिग्नल'चा वाद, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने मौन सोडलं

'कोडेड सिग्नल'चा वाद, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने मौन सोडलं

इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन (Ian Morgan) याने ड्रेसिंग रूममधून मैदानात देण्यात आलेल्या कोडेड सिग्नल (Coded Signal)च्या वादावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

    जोहान्सबर्ग, 5 डिसेंबर : इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन (Ian Morgan) याने ड्रेसिंग रूममधून मैदानात देण्यात आलेल्या कोडेड सिग्नलच्या वादावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजवेळी इंग्लंड टीमचे विश्लेषक नॅथन लिमन यांनी ड्रेसिंग रूममधून काही कार्ड दाखवली होती. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही यावर टीका केली होती. मॉर्गनने मात्र आपण काहीही चूक केली नसल्याचं म्हणलं आहे. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार हा प्रकार शंभर टक्के खेळ भावनेला धरून आहे, यामध्ये काहीही गैर नाही. प्रशिक्षकांचा सल्ला आणि नेमकं काय चाललं आहे, हे पाहण्यासाठी मदत घेतल्याचं मॉर्गन म्हणाला. तसंच आम्ही भविष्यातही हे सुरू ठेवू आणि मैदानात निर्णय घेण्यासाठी याचा काय फायदा होतो ते पाहू. ड्रेसिंग रूममधून मदत घेणं, माझ्यासाठी फायद्याचं आहे, असं मॉर्गन म्हणाला. ENG vs SA : मॉर्गनला मॅचवेळी ड्रेसिंग रुमममधून ‘कोड वर्ड’ ने सूचना, माजी कॅप्टनने दिला घरचा आहेर काय झाला वाद? दक्षिण आफ्रिकेच्या इनिंगची 19वी ओव्हर सुरू असताना नॅथन लेमन ड्रेसिंग रुममध्ये बसले होते. त्यांनी मॉर्गनला एक कार्ड दाखवले. या कार्डवर 4E आणि 2 C असे लिहिले होते. अर्थात या सर्व प्रकाराचा टीमला विशेष मदत झाल्याचा दावा इंग्लंडचा विकेटकिपर जॉस बटलर (Jos Buttler) ने फेटाळला आहे. “मॉर्गन आणि नॅथन अनेक दिवसांपासून एकत्र रणणिती तयार करतात. याच रणणितीनुसार त्यांनी एक प्रयोग राबवला. मॉर्गन हा जगातील एक श्रेष्ठ कॅप्टन आहे.’’ असे बटलरने सांगितले. मायकल वॉन नाराज इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन मात्र या सर्व प्रकारावर नाराज झाला आहे.  'मी इंग्लंडचा कॅप्टन असतो तर हा प्रकार कधीही केला नसता. मला नवे प्रयोग आवडतात, मी त्याला नेहमी उत्तेजन देतो. मात्र, विश्लेषकाने मैदानात कॅप्टनला सल्ला द्यावा हे मला पटत नाही’, असे वॉनने स्पष्ट केले. ECB चे स्पष्टीकरण इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) ने या सर्व प्रकारावर स्पष्टीकरण दिले आहे. कॅप्टन मॉर्गनला ड्रेसिंग रुममधून काही गोष्टींची माहिती देण्यात आली होते हे ECB ने मान्य केले आहे. त्याचबरोबर तो सल्ला स्विकारणे हे सर्वस्वी कॅप्टनवर अवलंबून असल्याची सारवासारव त्यांनी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 सीरिज इंग्लंडने 3-0 ने जिंकली. यानंतरची वनडे सीरिज पुढे ढकलण्यात आली. पहिल्या वनडेवेळी टॉस पडण्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे वनडे सीरिज पुढे ढकलण्याचा निर्णय दोन्ही क्रिकेट बोर्डाने घेतला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या