Home /News /sport /

WTC Final आधी टीम इंडियाला डबल धक्का, आता काय करणार विराट?

WTC Final आधी टीम इंडियाला डबल धक्का, आता काय करणार विराट?

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे, त्याआधीच भारताला मोठा धक्का लागला आहे.

    एजबॅस्टन, 13 जून : न्यूझीलंडचा इंग्लंडविरुद्धच्या (England vs New Zealand) दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये दणदणीत विजय झाला आहे. याचसोबत न्यूझीलंडने ही टेस्ट सीरिज 1-0 ने जिंकली आहे. या विजयासोबतच न्यूझीलंडची टीम भारताला (Team India) मागे टाकत टेस्ट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये 303 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 122 रन केले. न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये 388 रन केले होते, त्यामुळे त्यांना विजयासाठी 38 रनचं आव्हान मिळालं होतं. न्यूझीलंडने हे लक्ष्य 2 विकेट गमावून पूर्ण केलं. 22 वर्षानंतर न्यूझीलंडने इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली आहे. याआधी मागच्या 4 पैकी 3 सीरिजमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तर दुसरीकडे इंग्लंड 7 वर्षानंतर घरच्या मैदानात टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झाली आहे. याआधी 2014 साली श्रीलंकेने इंग्लंडचा 1-0 ने पराभव केला होता. याआधी न्यूझीलंडचा इंग्लंडमध्ये 1999 साली विजय झाला होता. त्यावेळी स्टीफन फ्लेमिंगच्या (Stephen Fleming) नेतृत्वातन न्यूझीलंडने 4 टेस्ट मॅचची सीरिज 2-1 ने जिंकली होती. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातली ही 18 वी सीरिज होती, यातला हा न्यूझीलंडचा फक्त तिसरा विजय आहे, तर इंग्लंडने 13 सीरिज जिंकल्या. टीम इंडियाला धक्का न्यूझीलंडचा इंग्लंडविरुद्धचा हा विजय टीम इंडियासाठी डबल धक्का आहे, कारण न्यूझीलंडच्या या विजयामुळे भारताला टेस्ट क्रमवारीमधलं पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडची टीमही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडचे फास्ट बॉलर या सीरिजमध्ये शानदार फॉर्ममध्ये होते. पहिल्या टेस्टमध्ये टीम साऊदीने 6 विकेट घेतल्या होत्या, तर काईल जेमिसननेही चांगली कामगिरी केली होती. दुसऱ्या टेस्टमध्ये ट्रेन्ट बोल्ट, नील वॅगनर आणि मॅट हेन्री यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये किवी टीम चार फास्ट बॉलर घेऊन उतरू शकते. कॉनवेचा धमाका आपली पहिलीच टेस्ट सीरिज खेळणाऱ्या डेवॉन कॉनवेने धमाकेदार कामगिरी केली आहे. लॉर्डसवर आपल्या पदार्पणाच्या टेस्टमध्येच त्याने द्विशतक करत विक्रम केला, तर दुसऱ्या टेस्टमध्येही त्याने अर्धशतकी खेळी केली. टेलर- बोल्ट फॉर्ममध्ये टीम इंडियाला कायमच त्रास देणारे ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) आणि रॉस टेलर (Ross Taylor) यांनाही या सीरिजमध्ये सूर गवसला आहे. या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 4 विकेट घेणाऱ्या ट्रेन्ट बोल्टने दुसऱ्या इनिंगमध्ये 2 विकेट घेतल्या. ट्रेन्ट बोल्टने भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. बोल्ट भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा न्यूझीलंडचा चौथ्या क्रमांकाचा बॉलर आहे. बोल्टने तिन्ही फॉरमॅटमध्ये 25 सामने खेळून तब्बल 66 विकेट घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने भारताविरुद्ध 9 मॅच खेळून 36 विकेट मिळवल्या. 2020 साली भारताविरुद्धच्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्येही बोल्टने टीम इंडियाला खूप त्रास दिला होता. 2 मॅचमध्येच त्याने भारताचे 11 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये पाठवले. चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) बोल्टने 4 वेळा आऊट केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये रॉस टेलरने 80 रनची खेळी केली आहे. न्यूझीलंडच्या सध्याच्या बॅट्समनमध्ये रॉस टेलरने भारताविरुद्ध सर्वाधिक 812 रन केले आहेत, यामध्ये 3 शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. केन विलियमसनने (Kane Williamson) भारताविरुद्ध 728 रन आणि टॉम लेथमने 345 रन केले. विलियमसनने (Kane Williamson) भारताविरुद्ध 2 शतकं आणि 4 अर्धशतकं केली. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. न्यूझीलंडच्या टीमचा हा फॉर्म बघता टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीला त्यांची रणनिती बदलावी लागू शकते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, England, New zealand, Team india

    पुढील बातम्या