लंडन, 21 जुलै : 2021 सालचा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएई आणि ओमानमध्ये होणार आहे. इंग्लंडच्या टीमने एक दिवस आधीच टी-20 सीरिजमध्ये पाकिस्तानचा (England vs Pakistan) 2-1 ने पराभव केला. यानंतर इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) मोठं वक्तव्य केलं. इंग्लंडची टीम वर्ल्ड कप जिंकेल अशी भविष्यवाणी ब्रॉडने केली, पण भारत आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी ब्रॉडच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली. इंग्लंडने 2010 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.
टी-20 सीरिजनंतर स्काय स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करणारा स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला, 'मी आता इयन मॉर्गनला (Eoin Morgan) ट्रॉफी उचलताना पाहिलं. मला वाटतं वर्ल्ड कपही आपणच जिंकू. इंग्लंडने बऱ्याच गोष्टी मजबूत केल्या आहेत. आपले खेळाडू निडर होऊन खेळतात, त्यामुळे टीम वर्ल्ड कप जिंकेल.'
स्टुअर्ट ब्रॉडची टी-20 कारकिर्द खास राहिली नाही. 2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारले होते. ब्रॉडने 56 टी-20 मॅचमध्ये 65 विकेट घेतल्या आहेत.
स्टुअर्ट ब्रॉडच्या या भविष्यवाणीनंतर भारत आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी त्याच्यावर निशाणा साधला. वेस्ट इंडिजचा दिग्गज ऑलराऊंडर ड्वॅन ब्राव्होने ब्रॉडवर पलटवार केला. 'स्टुअर्ट ब्रॉड कॉमेडियन झाला आहे, हे मला माहिती नव्हतं. सगळ्या टीमना शुभेच्छा, बघू काय होतं,' असं ब्राव्हो सोशल मीडियावर म्हणाला. वेस्ट इंडिजने सर्वाधिक 2 वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकला, तसंच टीम गतविजेतीही आहे. नुकताच वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा टी-20 सीरिजमध्ये 4-1 ने पराभव केला.
टीम इंडियाचा माजी स्पिनर मुरली कार्तिकनेही स्टुअर्ट ब्रॉडच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'इंग्लंडची टीम ट्रॉफी घरी आणण्याबाबतचं वक्तव्य करून स्वत:चीच खिल्ली उडवून घेत आहे, कारण ट्रॉफी त्यांच्यापासून अजून बरीच लांब आहे. युएईमध्ये होणाऱ्या स्पर्धेत भारत, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड विजयाचे प्रमुख दावेदार आहेत,' असं कार्तिक म्हणाला. टीम इंडियाला 2007 नंतर टी-20 वर्ल्ड कप जिंकता आला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, England, T20 world cup