नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : ड्रीम इलेव्हन नावाच्या स्पोर्ट्स गेमवर (Dream XI Fantasy League) बंदी घालण्याच्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने राजस्थान हायकोर्टाचा (Rajasthan High Court) निर्णय कायम ठेवत ड्रीम 11 वर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती आरएफ नरिमन आणि न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
ड्रीम 11 ऑनलाईन फॅन्टसी स्पोर्ट्स गेम आहे, यामध्ये लाईव्ह मॅच सुरू व्हायच्या आधी फॅन्टसी स्पोर्ट्स टीम बनवता येते, तसंच चाहत्यांना स्पर्धांमध्येही भाग घेता येतो. मॅच संपल्यानंतर चाहत्याने निवडलेल्या खेळाडूंना सर्वाधिक पॉईंट्स मिळाले, तर त्याला पुरस्कार म्हणून रोख रक्कम दिली जाते.
चंद्रेश सांखला नावाच्या एका व्यक्तीने राजस्थान हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. ड्रीम 11 च्या नावाने लोकांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. हाय कोर्टाने ही याचिका फेटाळत पंजाब-हरियाणा आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला. ड्रीम 11 जुगार आणि सट्टेबाजी नसल्याचं मत हायकोर्टाने मांडलं होतं.
पंजाब ऍण्ड हरियाणा हायकोर्टाने (Punjab and Haryana High Court) ड्रीम 11 वर बंदीची याचिका फेटाळली होती. 'ड्रीम 11 सारख्या ऑनलाईन खेळात वापरकर्त्यांना पुरस्कार व्यायाम, चांगलं ज्ञान, निर्णय आणि लक्ष यामुळे मिळतात. हा कौशल्याचा खेळ आहे,' असं निरिक्षण पंजाब ऍण्ड हरियाणा हायकोर्टाने नोंदवलं. तर मुंबई हायकोर्टानेही (Bombay High Court) हा खेळ कौशल्याचा असून एखाद्या विशिष्ट टीमच्या विजय किंवा पराभवावर अवलंबून नाही, असं मत मांडलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sports, Supreme court