मुंबई, 9 नोव्हेंबर : अमेरिकेच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन (Joe Biden) यांचा विजय झाला. जो बायडन आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार असल्यामुळे त्यांना जगभरातल्या नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. पण इंग्लंडचा क्रिकेटपटू जोफ्रा आर्चर याचं एक जुनं ट्वीट चर्चेत आलं आहे. याआधीही जोफ्रा आर्चर याची जुनी ट्विट नंतर खरी ठरत असल्याचं अनेकवेळा दिसून आलं आहे.
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदावर पहिल्यांदाच एका महिलेची निवड झाली आहे. कमला हॅरिस (Kamala Harris)उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्या आहेत. अमेरिकेच्या निवडणुकांचे निकाल लागले असले, तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून पराभव मान्य केलेला नाही.
जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याचं 2014 सालचं जुनं ट्वीट व्हायरल झालं आहे. या ट्वीटमध्ये जोफ्रा आर्चर याने अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष जो यांचं नाव लिहिलं आहे. या ट्वीटमुळे आर्चर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जोफ्रा आर्चर याने 2014 सालीच जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील, असं भाकीत वर्तवल्याची कमेंट अनेकांनी आर्चरच्या जुन्या ट्वीटवर केली आहे. याआधीही अनेकवेळा वर्तमान घटनांचा दाखला घेऊन जोफ्रा आर्चरची जुनी ट्वीट व्हायरल केली गेली आहेत.

डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन आणि रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये अमेरिकेतली निवडणूक झाली. या निवडणुकीत अमेरिकन नागरिकांनी रेकॉर्ड ब्रेक मतदान केलं आणि बायडन यांना जिंकवलं. निवडणूक जिंकल्यानंतर बायडन म्हणाले, 'मी फूट पाडण्याचं नाही तर एकजूट करण्याचा प्रयत्न करणार आहे. डेमोक्रॅटिक राज्य आणि रिपब्लिकन राज्यांमध्ये फरक केला जाणार नाही. संपूर्ण अमेरिकेला एकाच दृष्टीकोनातून बघितलं जाईल.' जो बायडन यांनी त्यांच्या समर्थकांचेही धन्यवाद मानले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.