कोल्हापूर-सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी अजिंक्य रहाणेची मदत, इतरांनाही केलं आवाहन!

कोल्हापूर-सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी अजिंक्य रहाणेची मदत, इतरांनाही केलं आवाहन!

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पुर ओसरला असला तरी जनजीवन सुरळीत होण्यासाठी वेळ लागेल.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा तडाखा बसला. गेल्या शतकातील सर्वात मोठा महापूर असल्याचं म्हटलं जात आहे. यात दोन्ही जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं आहे. पुरग्रस्तांना संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. स्वयंसेवी संस्था, सोशल मीडियावरचे मित्र मदतीचा हात पुढे करत आहेत. आता भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनही मदतीचा हात पुढं केला आहे.

अजिंक्य रहाणेनं ट्विटरवरं म्हटलं आहे की, आपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा असं आवाहनही रहाणेनं केलं आहे.

महापुरानं दोन्ही जिल्ह्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. गेल्या आठ दिवसापासून पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक मंगळवारी सुरू झाली. आतापर्यंत राज्यातील जवळपास 4 लाख 66 हजार 963 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. पूरग्रस्तांसाठी 441 तात्पुरती निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी नागरिकांची सोय करण्यात आली असून तिथं वैद्यकिय सेवाही पुरवण्यात आली आहे.

पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

महापुराच्या संकटातून सावरणाऱ्या कोल्हापूर आणि साताऱ्यात वेधशाळेनं पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर, सांगली आणि पुण्यातल्या घाट क्षेत्रामध्ये 13 आणि 14 ऑगस्टला मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता कुठे पाणी ओसरून पुरामुळे उद्ध्वस्त झालेला संसार सुरळीत सुरू करायचा आहे. त्यात आता हवामान खात्याच्या अंदाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

गेल्या 8 दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं. त्यात सोमवारी मात्र पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. पण आज आणि उद्या पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नागरिकांची चिंता वाढणार आहे. दरम्यान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडला. तर कोकणातल्या सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये 13 आणि 14ला तुरळक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

'सांगली, कोल्हापुरातील महापुराला सरकारच जबाबदार?' पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 11:50 AM IST

ताज्या बातम्या