आयसीसीने बदलले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे नियम, टीम इंडिया गेली या स्थानावर
आयसीसी (ICC) ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship) चे नियम बदलल्यामुळे टीम इंडिया (Team India) चं नुकसान झालं आहे. या बदलेल्या नियमांमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारत पहिल्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
मुंबई : आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे नियम बदलल्यामुळे टीम इंडियाचं नुकसान झालं आहे. या बदलेल्या नियमांमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारत पहिल्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. आयसीसी (ICC) ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship) च्या पॉईंट्स टेबलचा आधार जिंकण्याची टक्केवारी केली आहे, त्यामुळे भारत पहिल्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
टीम इंडियाने 4 सीरिज खेळल्यानंतर त्यांच्या विजयाची टक्केवारी 75 आहे, तर ऑस्ट्रेलियाने 3 सीरिजमधल्या 82.22 टक्के मॅच जिंकल्या आहेत. या नियमाआधी टीम इंडिया 360 पॉईंट्ससह पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया 296 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर होती. आयसीसीने नियम बदलल्यामुळे आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली आगामी टेस्ट सीरिज आणखी रोमांचक होणार आहे.
भारताविरुद्ध सीरिज खेळल्यानंतर ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडची टीम भारतात येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातही टेस्ट सीरिज होणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडने 4 टेस्ट सीरिजमध्ये 60.83 टक्के, चौथ्या क्रमांकाच्या न्यूझीलंडने 50 टक्के, पाचव्या क्रमांकावरच्या पाकिस्तानने 39.52 टक्के विजय मिळवले आहेत. तर श्रीलंका सहाव्या, वेस्ट इंडिज सातव्या, दक्षिण आफ्रिका आठव्या आणि बांगलादेश नवव्या क्रमांकावर आहे.