बर्मिंगहॅम, 30 जून: ICC Cricket World Cupमध्ये आज भारतीय संघाचा मुकाबला यजमान इंग्लंडविरुद्ध होणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास त्यांचे सेमीफायनलमधील स्थान निश्चित होईल. तर याउलट इंग्लंडची अवस्था आहे. त्यांनी शेवटचे दोन सामने गमवले आहेत. त्यामुळे सेमीफायनलच्या दृष्टीने इंग्लंडसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. वर्ल्डकप सुरु झाल्यावर इंग्लंड सर्वात फेव्हरेट संघ होता. इंग्लंडने सुरुवात देखील दमदार केली होती. पहिल्या 5 पैकी 4 सामन्यात त्यांनी विजय मिळवला होता. पण श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन सामन्यात पराभव झाल्यामुळे इंग्लंड अडचणीत आला आहे. सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी इंग्लंडला शिल्लक दोनपैकी किमान एका सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. यामुळेच इंग्लंडचा हा प्रवास इतका सोपा राहिला नाही.
World Cup: पाकच्या विजयानंतर मैदानात चाहत्यांचा राडा; खेळाडूंनाही सोडलं नाही!
27 वर्षात झाला नाही पराभव
वर्ल्डकपचा इतिहास पाहिल्यास 1992नंतर भारताने इंग्लंडविरुद्ध या स्पर्धेत कधीच पराभव स्विकारलेला नाही. 2011च्या स्पर्धेत दोन्ही संघातील सामना टाय झाला होता. इंग्लंडने वर्ल्डकपमध्ये 1992 साली भारताचा शेवटचा पराभव केला होता. त्यानंतर 6 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडला भारताचा पराभव करता आलेला नाही. दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 7 सामने झाले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना टाय झाला आहे.
याशिवाय या स्पर्धेत भारताने अद्याप पराभव पाहिला नाही. इतक नव्हे तर आज ज्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध सामना होणार आहे त्या मैदानावरील भारताची कामगिरी अव्वल नंबरची आहे. एजबॅस्टन मैदानावर गेल्या 6 वर्षात भारताने एकही सामना गमवलेला नाही. या मैदानावर भारताने शेवटचे 5 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडविरुद्ध या मैदानावर भारताने 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे.
पावसाची शक्यता किती
वर्ल्डकपमधील अनेक सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. रविवारी होणाऱ्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील सामन्यावर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. ब्रिटिश मॅटने वर्तवलेल्या अंदाजानुसार तापमान 22 डिग्री सेल्सिअस राहिल तर पावसाची शक्यता 10 टक्केपेक्षा कमी आहे. हवामान खात्याचा अंदाज चुकलाच तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक गुण मिळेल. यामुळे भारत 12 गुणांसह सेमीफायनलमध्ये प्रवेश करले. तर इंग्लंडचे 8 सामन्यात 9 गुण होतील. त्यामुळे त्यांची सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी होईल.
नव्या जर्सीत खेळणार टीम इंडिया
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ नव्या जर्सीत खेळणार आहे. भारतीय संघ 'होम अवे' या नियमानुसार नव्या जर्सीत खेळणार आहे. इंग्लंड संघाच्या जर्सीचा रंग आणि भारतीय संघाच्या जर्सीचा रंग मिळता जुळता आहे. या सामन्यात भारत भगव्या रंगाच्या जर्सीत खेळणार आहे.
सर्वोत्तम अद्याप शिल्लक आहे
भारतीय संघाने अद्याप वर्ल्डकपमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली नाही. जवळ जवळ प्रत्येक सामन्यात भारतीय संघाने सहज विजय मिळवला आहे. सर्वाधिक धावा किंवा विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंमध्ये एकाही भारतीय संघातील खेळाडूचा समावेश नाही. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे सर्वोत्त फॉर्ममध्ये आहेत. तर यजवेंद्र चहल आमि कुलदीप यादव हे देखील मोक्याच्या क्षणी विकेट घेण्यात यशस्वी ठरले आहेत.
चालकानं हातात छत्री धरून चालवली KDMCची गळकी बस, VIDEO व्हायरल