World Cup Super League : सीरिज जिंकून ऑस्ट्रेलिया नंबर 1, भारताला मोठा धक्का

World Cup Super League : सीरिज जिंकून ऑस्ट्रेलिया नंबर 1, भारताला मोठा धक्का

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया (India vs Australia) चा 2-1 ने विजय झाला. या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड कप (ICC World Cup) सुपर वनडे लीगच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांक गाठला आहे.

  • Share this:

दुबई, 3 डिसेंबर : भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया (India vs Australia) चा 2-1 ने विजय झाला. या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड कप (ICC World Cup) सुपर वनडे लीगच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांक गाठला आहे. हा विजय मिळवताच ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 40 पॉईंट्स झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला हरवून पहिला क्रमांक पटकावला आहे, त्यामुळे इंग्लंडची टीम दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये तिसरी वनडे जिंकणारी टीम इंडिया सहाव्या क्रमांकावर आहे. भारतीय टीमच्या खात्यात सध्या 9 पॉईंट्स आहेत.

एरॉन फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी करत सीरिज खिशात टाकली. विराटच्या टीमसाठी हे वर्ष फारसं चांगलं राहिलं नाही. वर्षाच्या सुरुवातीला भारताने मायदेशात झालेली वनडे सीरिज 2-1 ने जिंकली. यानंतर न्यूझीलंड दौऱ्यात भारताला टी-20 सीरिजमध्ये विजय मिळाला, तर वनडे आणि टेस्ट सीरिज गमवावी लागली. आता ऑस्ट्रेलियातल्या वनडे सीरिजमध्येही त्यांचा पराभव झाला.

2023 वर्ल्ड कपसाठी थेट क्वालिफाय

ऑस्ट्रेलियाने 13 टीमच्या या चॅम्पियनशीपमध्ये मागच्या सीरिजवेळी इंग्लंडलाही 2-1 ने मात दिली होती. या वर्षाच्या सुरुवातीलाच आयसीसीने 2023 वर्ल्ड कपसाठी ही चॅम्पियनशीप सुरू केली आहे. या चॅम्पियनशीपमध्ये सात टीम वर्ल्ड कपसाठी थेट क्वालिफाय होणार आहेत. भारतातच वर्ल्ड कप होणार असल्यामुळे त्यांचं स्थान या क्वालिफायरमध्ये आधीच पक्कं आहे.

चॅम्पियनशीपच्या या पॉईंट्स टेबलमध्ये इंग्लंड 30 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने आयर्लंडचा 2-1 ने पराभव केला. तर पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 2-1 ने पराभव केला, त्यामुळे पाकिस्तानच्या नावावर 20 आणि झिम्बाब्वेच्या नावावर 10 पॉईंट्स आहेत. या पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान तिसऱ्या, झिम्बाब्वे चौथ्या आणि आयर्लंड पाचव्या क्रमांकावर आहे.

नेदरलॅँड्स, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांनी एकही मॅच न खेळल्यामुळे त्यांच्या खात्यात अजून एकही पॉईंट नाही.

Published by: Shreyas
First published: December 3, 2020, 4:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या