लाहोर, 29 नोव्हेंबर : पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. बाबर आझमने 10 वर्ष आपलं लैंगिक शोषण केलं आणि लग्नाचं खोटं आश्वासन दिलं, असा दावा या महिलेने केला आहे. शनिवारी पत्रकार परिषद घेऊन महिलेने बाबरवर हे गंभीर आरोप केले. सोबतच कठीण प्रसंगामध्ये बाबर आझमने आपल्याला आर्थिक मदत केल्याचंही महिलेने सांगितलं आहे.
बाबर माझा शाळेतला मित्र असून 2010 साली त्याने मला लग्नासाठी प्रपोज केलं, तसंच त्याने पोलिसांकडे गेले तर जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. पाकिस्तानचे क्रीडा पत्रकार साज सादिक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन या महिलेचा व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये महिलने बाबर आझमने आपल्याला कोर्टात लग्न करण्यासाठी घरातून पळवून आणलं आणि लैंगिक शोषण आणि मारपीट केल्याचे दावे केले आहेत.
So this lady has made accusations against Babar Azam "he promised to marry me, he got me pregnant, he beat me up, he threatened me and he used me"
पाकिस्तानची क्रिकेट टीम ही सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे, पण हा दौरा वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. पाकिस्तानचे 7 क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यामुळे त्यांना विलगिकरणात ठेवण्यात आलं आहे. पाकिस्तानची 53 सदस्य असलेली टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर गेली आहे, यापैकी 6 जणांची कोरोना टेस्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आली होती, यानंतर सातवा सदस्य शुक्रवारी पॉझिटिव्ह आला.
न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाईन होणं बंधनकारक होतं, पण खेळाडूंनी हे नियम मोडल्याचं समोर आलं आहे. हॉटेलमध्ये खेळाडू एकमेकांना भेटत होते, तसंच जेवणही करत असल्याचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं. या घटनेनंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानला इशारा दिला. आता नियम मोडले गेले तर दौरा रद्द करून पुन्हा पाकिस्तानला पाठवलं जाईल, असं न्यूझीलंडकडून सांगण्यात आलं.