नवी दिल्ली, 13 मार्च: टी-20 क्रिकेटमुळे वनडे सामन्यांचे स्वरुपच बदलले आहे. आता जवळ जवळ प्रत्येक सामन्यात मोठी धावसंख्या होते. पण दिल्लीच्या मैदानावर 300 धावसंख्या कोणत्याही संघासाठी अडचणीची ठरू शकते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना बुधवारी दिल्लीत सुरु आहे. मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकल्यामुळे अंतिम सामना दोन्ही संघासाठी करो की मरो असा आहे. कागदावर नजर टाकल्यास भारतीय संघाचे पारडे जड वाटते. मात्र गेल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुप्पट झाला आहे.
पण या सामन्यात भारताचा पराभव होण्याची शक्यता अधिक आहे. जाणून घ्या कारणे...
दिल्लीच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी नाणेफेक महत्त्वाची ठरते. या मैदानावर कोणताही संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देतो. गेल्या 8 वर्षात या मैदानावर कोणत्याही संघाने धावांचा पाठलाग करताना सामना जिंकला नाही. 2013पासून या मैदानावर 6 वनडे झाले आहेत आणि या प्रत्येक सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानेच विजय मिळवला आहे.
नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणे हे कोणत्याही कर्णधारासाठी सोपे असणार नाही. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच दिल्लीत थंडी पडली आहे. त्यामुळे दव पडल्याने रात्रीच्या वेळी गोलंदाजी करणे ही सोपी गोष्ट नाही. मोहालीत झालेल्या दुसऱ्या सामन्यात ड्यू फॅक्टरमुळे भारतीय गोलंदाजांना त्रास झाला होता. भौगोलिकदृष्ट्या मोहाली आणि दिल्लीतील हवामानात फार फरक नाही.
टी-20 क्रिकेटमुळे वनडे सामन्यांचे गणितच बदलले आहे. दिल्लीच्या मैदानावर 300च्या जवळपासची धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाला आव्हानात्मक ठरू शकते. या मैदानावर आतापर्यंत दोन वेळाच 300हून अधिक धावा झाल्या आहेत. गेल्या 8 वर्षात या मैदानावर कोणत्याही संघाने 300हून अधिक धावा केल्या नाहीत. 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजने 330 धावा केल्या होत्या.
इतकच नव्हे तर 2011नंतर केवळ एकदाच या मैदानावर 250हून अधिक धावा झाल्या आहेत. 2013मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध केवळ 167 धावा केल्यानंतर देखील विजय मिळवला होता.