क्रिकेटला मिळाला नवा सुलतान! चौकार आणि षटकाराने केल्या 222 धावा

जागतिक क्रिकेटविश्वात एका नव्या सुलतानचा जन्म झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 01:20 PM IST

क्रिकेटला मिळाला नवा सुलतान! चौकार आणि षटकाराने केल्या 222 धावा

वेलिंग्टन, 29 ऑक्टोबर: जागतिक क्रिकेटविश्वात एका नव्या सुलतानचा जन्म झाला आहे. होय नव्या म्हणण्याचे कारण असे की, पाकिस्तानविरुद्ध त्रिशतकी खेळी करुन मुलतान के सुलतान असे नाव भारताच्या विरेंद्र सेहवागने मिळवले होते. ज्याची फलंदाजी पाहिल्यानंतर विरेंद्र सेहवागची आठवण यावी अशा न्यूझीलंडच्या डेव्होन कॉन्वे (Devon Conway)याने नाबाद 327 धावांची झंझावाती खेळी करून संपूर्ण जगाचे लक्ष स्वत:कडे वेधले आहे. गेल्याच सामन्यात नाबाद 261 धावांची खेळी करणाऱ्या कॉन्वे याने आता न्यूझीलंडमधील देशांतर्गत प्लंकेट शील्ड (Plunket Shield)स्पर्धेत कॅटरबरीविरुद्ध त्रिशतकी खेळी केली.

डेव्होन कॉन्वे गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट विश्वाच चर्चेत आले आहे. कॉन्वे सध्या न्यूझीलंडमधील देशांतर्गत प्लंकेट शील्ड स्पर्धेत वेलिंग्टन फायरबर्ड्स (Wellington Firebirds)कडून खेळत असून त्याने या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी अफलातून कामगिरी केली आहे. चार दिवसांपूर्वी कॉन्वे याने नाबाद 261 धावांची खेळी केली होती. या आक्रमक खेळीत 36 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. आता कॉन्वे याने कॅटरबरीविरुद्ध नाबाद 327 धावांची खेळी केली. यात त्याने 48 चौकार आणि 5 षटकार मारले. विशेष म्हणजे कॉन्वेच्या 222 धावा या केवळ षटकार आणि चौकारांच्या माध्यमातूनच आल्या आहेत.

कॉन्वेच्या या खेळीमुळे त्याची तुलना भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग याच्याशी केली जात आहे. सेहवाग देखील चौकार आणि षटकारांच्या मदतीने वेगवान धावा करण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतक (Triple-century) आणि वनडेमध्ये एका द्विशतकाची नोंद आहे. वेलिंग्टन येथे झालेल्या सामन्यात कॉन्वे याने 334 चेंडूत त्रिशतक पूर्ण केले. न्यूझीलंडकडून प्रथम श्रेणी सामन्यातील हे आठवे त्रिशतक ठरले आहे. कॉन्वेने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 17 शतके झळकावली आहेत.

क्रिकेटविश्वाला मिळाल नवा सेहवाग; 36 चौकार, 5 षटकारांसह ठोकल्या नाबाद 261 धावा!

डेव्होनचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील आहे. दोनच वर्षापूर्वी तो पत्नी किमसह जोहान्सबर्गहून वेलिंग्टन(Wellington)मध्ये आला होता. गेल्या काही वर्षात डेव्होन सातत्याने दमदार कामगिरी करत असून कसोटी सारख्या प्रकारात त्याने मोठ्या खेळी केल्या आहेत. अर्थात न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळायचे असल्याचे डेव्होनला 2020पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. न्यूझीलंडच्या संघाकडून खेळण्यासाठी त्याने किमान 3 वर्ष देशात राहणे बंधनकारक आहे. 28 वर्षीय कॉन्वे पुढील वर्षी सप्टेंबर मध्ये न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्यास पात्र ठरेल. याआधी मुळचे दक्षिण आफ्रिकेचे असलेले नील व्हॅगनर, बीजे वाटलिंग आणि ग्रांट इलियट या क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडे प्रतिनिधीत्व केले आहे.

Loading...

गेल्यावर्षी वेलिंग्टन फायरबर्ड्सकडून खेळताना हंगामातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती. प्लंकेट शील्ड स्पर्धेत त्याने गेल्यावर्षी 82.37च्या सरासरीने 659 धावा केल्या होत्या. यात दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. गेल्या हंगामात त्याने ओटागोविरुद्ध खेळताना नाबाद 203 धावांची खेळी केली होती. यावेळी त्याने स्वत:चा विक्रम मागे टाकला.

टी-20 वर्ल्डकपवर नजर

डेव्होन कॉन्वेच्या कामगिरीवर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे लक्ष आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून डेव्होन बोर्डाच्या रडारावर आहे. पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने डेव्होनची इंट्रा स्वायट टी-20 सामन्यांसाठी निवड करण्यात आली होती. डेव्होनने अनेक वेळा संघाला संकटातून बाहेर काढले आहे. एका सामन्यात संघाची अवस्था 4 बाद 54 अशी असताना त्याने 6 तास फलंदाजीकरत संघाला 6 बाद 415 अशा मजबूत स्थितीत पोहोचवले होते.

प्रथम श्रेणी सामन्यात वेलिंग्टन फायरबर्ड्सकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मायकल पॅप्सच्या नावावर आहे. त्याने 2017-18मध्ये ऑकलँडविरुद्ध नाबाद 316 धावांची खेळी केली होती. दुसऱ्या स्थानावर जॉन रीड आहे. त्याने 1962-63मध्ये 296 धावांची खेळी केली होती. या क्रमवारीत डेव्होन नाबाद 261 धावांच्या खेळीसह पाचव्या स्थानावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2019 01:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...