वेलिंग्टन, 29 ऑक्टोबर: पहिल्या चेंडूपासून गोलंदाजावर तुटून पडायचे आणि विरोधी संघातील आक्रमकतेची धार काढून घ्यायची अशा आक्रमक पद्धतीच्या फलंदाजीसाठी भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)ओळखला जात होता. भारताच्या या स्फोटक फलंदाजाच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतक झळकावण्याचा विक्रम आहे. सेहवाग जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतर असे तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट देखील अधिक असायचा. कारण तो तितक्या वेगाने धावा करायचा. सेहवागच्या या आक्रमक स्टाईलची आठवण काढण्याचे कारण म्हणजे अशाच पद्धतीने फलंदाजी एका खेळाडूचा उदय झाला आहे.
विरेंद्र सेहवाग प्रमाणे स्फोटक फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाचे नाव डेव्होन कॉन्वे (Devon Conway)असून तो न्यूझीलंड (New Zealand) संघाचे प्रतिनिधित्व करतो. न्यूझीलंडमधील देशांतर्गत प्लंकेट शील्ड स्पर्धेत वेलिंग्टन फायरबर्ड्स(Wellington Firebirds)कडून खेळताना त्याने नाबाद 261 धावांची खेळी केली. यासाठी त्याने केवळ 299 चेंडू खेळले. डेव्होनच्या या आक्रमक खेळीत 36 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. 28 वर्षीय डेव्होनची ही करिअरमधील सर्वोच्च खेळी आहे.
डेव्होनचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील आहे. दोनच वर्षापूर्वी तो पत्नी किमसह जोहान्सबर्गहून वेलिंग्टन(Wellington)मध्ये आला होता. गेल्या काही वर्षात डेव्होन सातत्याने दमदार कामगिरी करत असून कसोटी सारख्या प्रकारात त्याने मोठ्या खेळी केल्या आहेत. अर्थात न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळायचे असल्याचे डेव्होनला 2020पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. न्यूझीलंडच्या संघाकडून खेळण्यासाठी त्याने किमान 3 वर्ष देशात राहणे बंधनकारक आहे.
Productive day Dev! 🏏💯💯#cricketnation #WEAREWELLINGTON pic.twitter.com/vYzkEz9BTq
— Wellington Firebirds (@wgtnfirebirds) October 29, 2019
गेल्यावर्षी वेलिंग्टन फायरबर्ड्सकडून खेळताना हंगामातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती. प्लंकेट शील्ड स्पर्धेत त्याने गेल्यावर्षी 82.37च्या सरासरीने 659 धावा केल्या होत्या. यात दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. गेल्या हंगामात त्याने ओटागोविरुद्ध खेळताना नाबाद 203 धावांची खेळी केली होती. यावेळी त्याने स्वत:चा विक्रम मागे टाकला.
टी-20 वर्ल्डकपवर नजर
डेव्होन कॉन्वेच्या कामगिरीवर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे लक्ष आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून डेव्होन बोर्डाच्या रडारावर आहे. पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने डेव्होनची इंट्रा स्वायट टी-20 सामन्यांसाठी निवड करण्यात आली होती. डेव्होनने अनेक वेळा संघाला संकटातून बाहेर काढले आहे. एका सामन्यात संघाची अवस्था 4 बाद 54 अशी असताना त्याने 6 तास फलंदाजीकरत संघाला 6 बाद 415 अशा मजबूत स्थितीत पोहोचवले होते.
प्रथम श्रेणी सामन्यात वेलिंग्टन फायरबर्ड्सकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मायकल पॅप्सच्या नावावर आहे. त्याने 2017-18मध्ये ऑकलँडविरुद्ध नाबाद 316 धावांची खेळी केली होती. दुसऱ्या स्थानावर जॉन रीड आहे. त्याने 1962-63मध्ये 296 धावांची खेळी केली होती. या क्रमवारीत डेव्होन नाबाद 261 धावांच्या खेळीसह पाचव्या स्थानावर आहे.
'ठरलं ते झालं नाही तर...',युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, New zealand, Virender sehwag