मुंबई, 8 नोव्हेंबर : झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये पाकिस्तानचा विजय झाला. पण या सामन्यात पाकिस्तानचा फास्ट बॉलर वहाब रियाझ (Wahab Riaz) याने आयसीसीच्या नियमांचं उल्लंखन केलं. कोरोना व्हायरसमुळे आयसीसीने बॉलवर लाळ लावायला बंदी घातली आहे, तरीही रियाझने बॉलला लाळ लावल्यामुळे अंपायरनी त्याला ताकीद दिली. झिम्बाब्वेच्या बॅटिंगवेळी 11 व्या ओव्हरमध्ये अंपायर अलीम दार आणि एशिया याकूब यांनी वहाबला बॉलला लाळ लावताना पाहिलं. यानंतर अंपायरनी त्याला बॉल जमिनीवर टाकायला सांगितला.
बॉल म्हणजे हॅण्ड ग्रेनेड
यानंतर राखीव अंपायर वाइप्स घेऊन मैदानात आला आणि त्याने बॉल स्वच्छ केला आणि खेळाला पुन्हा सुरुवात झाली. राखीव अंपायर घाबरत घाबरतच बॉल स्वच्छ करत होता, त्यामुळे कॉमेंटेटर रमीझ राजा यांनी असं वाटतंय की अंपायर हॅण्ड ग्रेनेडला स्पर्श करत आहे, असं वक्तव्य केलं. रमीझ राजा यांनी हे वक्तव्य मस्करीमध्ये केलं असलं, तरी ते सोशल मीडियावर व्हायरल व्हायला फार वेळ लागला नाही.
Sanitising ball as Wahab Riaz applied saliva. #PakVsZim pic.twitter.com/lD1G6Wd7ho
— Ram (@imRamaReddy) November 7, 2020
आयपीएलमध्येही नियम भंग
ऑगस्ट महिन्यामध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिर याला ओल्ड ट्रॅफर्डमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचदरम्यान बॉलला लाळ लावल्याप्रकरणी ताकीद दिली होती. आयपीएल (IPL 2020) मध्येही बँगलोर (RCB)चा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि राजस्थान (RR)चा खेळाडू रॉबिन उथप्पा यांनी बॉलला लाळ लावल्याचे व्हिडिओ समोर आले होते. आयसीसीच्या नियमानुसार खेळाडूंना तीनवेळा ताकीद दिली जाते, यानंतरही नियम मोडला तर बॉलिंग टीमला 5 पॉईंट्सची पेनल्टी दिली जाते.
पाकिस्तानचा विजय
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये पाकिस्तानचा अगदी सहज विजय झाला. पहिले बॅटिंग करणाऱ्या झिम्बाब्वेने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 156 रन केले होते, या आव्हानाचा पाठलाग पाकिस्तानने 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून केला. बाबर आझमने 55 बॉलमध्ये 82 रनची खेळी केली.