मुंबई, 16 डिसेंबर : भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची घोषणा व्हायच्या दीड तास आधी मला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं, असं विराट म्हणाला. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडण्याआधी आपण बीसीसीआयला याबाबत माहिती दिली, पण याबाबत बीसीसीआयसोबत काहीच बोलणं झालं नाही, असा दावा विराटने केला.
विराट कोहलीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी विराटला मिळालेल्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. तर काही नेटीझन्सना टीम इंडियाचा माजी हेड कोच अनिल कुंबळेची (Anil Kumble) आठवण झाली. कुंबळेला 2017 साली विराटशी झालेल्या वादानंतर राजीनामा द्यावा लागला होता.
आपण कोचपदी कायम राहू नये, अशी विराटची इच्छा असल्याचे संकेत कुंबळेने राजीनामा देताना दिले होते. अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्रीची (Ravi Shastri) त्या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. नेटीझन्सनं त्या सर्व प्रकरणाची आठवण करून देत 'करावे तसे भरावे' असा टोला विराटला लगावला आहे.
'मला वनडे आणि टेस्ट टीमचं कॅप्टन राहायचं आहे, असं निवड समितीला सांगितलं, पण निवड समिती किंवा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी काही निर्णय घेतला, तर मी त्यासाठी तयार आहे. निवड समितीने जो निर्णय घेतला तो समोर आहे. निवड समिती आणि बोर्ड अधिकाऱ्यांची इच्छा असेल तर मी कर्णधार राहण्यासाठी तयार असल्याचं मी सांगितलं,' असं वक्तव्य विराटने बुधवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले होते.
'मास्टर ब्लास्टर' विराट कोहलीवर आजही भारी, निवृत्तीनंतर 8 वर्षांनीही लोकप्रियतेत आघाडी
विराट कोहलीच्या या वक्तव्यामुळे त्याच्यात आणि बीसीसीआयमध्ये संवादाचा अभाव आहे, हे दिसून आलं आहे. याशिवाय रोहितला वनडे टीमचा कॅप्टन केल्याची घोषणा करताना बीसीसीआयने केलेल्या ट्वीटमध्ये विराट कोहलीचा उल्लेखही नव्हता. तसंच विराट कोहलीनेही यानंतर रोहित शर्माला शुभेच्छाही दिल्या नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Social media, Virat kohli