मुंबई, 7 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर टीम इंडिया (Team India)ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय टीम वनडे, टी-20 आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. पण माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन टेस्टमध्ये खेळणार नाही. भारतीय टीमचा ऑस्ट्रेलिया दौरा वनडे सीरिजपासून याच महिन्यात सुरू होणार आहे. आयपीएल संपल्यानंतर खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत.
भारतीय टीम 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज ऑस्ट्रेलियात खेळणार आहे. पण शेवटच्या 2 टेस्ट मॅचमध्ये विराट खेळताना दिसणार नाही. जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विराट आणि अनुष्का यांच्या बाळाचा जन्म होणार आहे. त्यामुळे विराट शेवटच्या 2 टेस्ट खेळणार नाही.
विराट कोहली किंवा बीसीसीआयने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, पण बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला दिलेल्या वृत्तानुसार विराट पहिल्या दोन टेस्ट खेळल्यानंतर सुट्टी घेऊ शकतो. 17 डिसेंबरपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होत आहे. बीसीसीआयसाठी खेळाडूचं कुटुंब सगळ्यात महत्त्वाचं असल्याचं, बीसीसीआय सूत्राने पीटीआयला सांगितलं. त्यामुळे विराट अनुष्का आणि त्याच्या बाळासाठी दोन टेस्ट मॅच न खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो.
चार टेस्ट मॅचच्या सीरिजला ऍडलेडपासून सुरुवात होणार आहे. 17-21 डिसेंबरमध्ये डे-नाईट टेस्ट, 26-30 डिसेंबर मेलबर्न, 7-11 जानेवारी सिडनी आणि 15-19 जानेवारी ब्रिस्बेनमध्ये टेस्ट मॅच खेळवल्या जाणार आहेत.
बीसीसीआय नेहमीच खेळाडूंना पितृत्वाची सुट्टी देते, भारतीय खेळाडू आणि कर्णधारासाठी हा नियम वेगळा नाही. नेहमीच्या परिस्थितीमध्ये एक मॅचची सुट्टी घेऊन पुढच्या मॅचसाठी विराटचं पुनरागमन झालं असतं, पण कोरोनामुळे 14 दिवस क्वारंटाईन व्हायला लागत असल्यामुळे विराटचं खेळणं कठीण आहे.