सिडनी, 1 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया (India vs Australia) चा पराभव झाला आहे. यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याला कर्णधारपदावरून काढण्याची मागणी जोर धरत आहे. काही माजी क्रिकेटपटूंनीही विराटला निदान टी-20 क्रिकेटच्या नेतृत्वातून विश्रांती द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पण भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) च्या मते भारतीय टीमकडे विराटशिवाय कोणताही पर्याय नाही. विराट कोहलीचं कर्णधारपदाचं रेकॉर्ड धोनीपेक्षा चांगलं आहे.
क्रिकबझच्या शोमध्ये बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, 'लोकांच्या डोक्यात आयपीएल असतं. त्यांना विराटच्या नेतृत्वात बँगलोरने चांगली कामगिरी केली नाही, ते दिसतं. चाहतेच नाहीत, तर माजी क्रिकेटपटूही असं बोलतात. एमएस धोनी भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. जर धोनीच्या नेतृत्वात मिळवलेल्या विजयाची टक्केवारी बघितली तर विराट त्याच्यापेक्षा कमीत कमी 10 टक्के पुढे आहे. आपण लोकं भावनिक होतो. श्रेयस अय्यरलाही बाहेर काढण्याच्या गोष्टी करतो.'
'जर स्वत: विराट कोहलीने नेतृत्व सोडलं तर टीम इंडियाकडे नेतृत्वासाठी दुसरा पर्याय नाही. तो क४णधार म्हणून चांगली कामगिरी करत आहे. कोहलीने आयसीसीची ट्रॉफी जिंकली नसली, तरी टीम सेमी फायनल आणि फायनलमध्ये पोहोचली. विराटला तुम्ही अशापद्धतीने कर्णधारपदावरून हटवू शकत नाही, त्याची विजयाची टक्केवारी चांगली आहे,' अशी प्रतिक्रिया आकाश चोप्राने दिली.