मुंबई, 12 डिसेंबर : विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धा सध्या रंगतदार अवस्थेत आली आहे. या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीकडे राष्ट्रीय निवड समिती तसंच आयपीएलच्या टीमचं लक्ष आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील वन-डे सीरिजसाठी टीम निवडताना या स्पर्धेचा विचार केला जाणार आहे. त्याचबरोबर आगामी आयपीएल लिलावापूर्वी टीमचं लक्ष वेधून घेण्याची संधी या स्पर्धेत खेळाडूंना आहे.
पंजाब किंग्जनं पुढील आयपीएल स्पर्धेत रिटेन केलेल्या अर्शदीप सिंगचं (Arshdeep Singh) पुढील लक्ष हे टीम इंडिया आहे. विजय हजारे स्पर्धेत त्याची सातत्यपूर्ण कामगिरी सुरू आहे. त्याने या स्पर्धेत आत्तापर्यंत 4 मॅचमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत. 22 वर्षाच्या या बॉलरनं या स्पर्धेत 4 पेक्षा कमी इकोनोमी रेटनं रन दिले आहेत. त्याने रविवारी सर्विसेस विरुद्ध खेळताना 10 ओव्हरमध्ये 41 रन देत 1 विकेट घेतली. यापूर्वीच्या तीन मॅचमध्ये त्याने 7 विकेट्स घेतल्या होत्या. अर्शदीपला पंजाब किंग्जने 4 कोटींची रक्कम देत पुढील सिझनसाठी रिटेन केले आहे. त्याचा हा फॉर्म प्रिती झिंटाच्या टीमला दिलासा देणारा आहे.
SRH ची चिंता वाढली
पंजाब किंग्जला दिलासा मिळालेला असतानाच मागील आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) अडचणी कायम आहेत. हैदराबादने जम्मू काश्मीरचा ऑल राऊंडर अब्दुल समदवर (Abdul Samad) मोठा विश्वास दाखवत त्याला रिटेन केले आहे. त्याने विजय हजारे स्पर्धेत आजवर 4 मॅचमध्ये फक्त 5 च्या सरासरीनं 20 रन केले आहेत. ओडिशाविरुद्ध रविवारी झालेल्या मॅचमध्ये (Jammu Kashmir vs Odisha) समद फक्त 6 रन काढून आऊट झाला. त्याला या स्पर्धेत आजवर एकही विकेट मिळालेली नाही.
Vijay Hazare Trophy : 6 जण झाले शून्यावर आऊट, 50 ओव्हर्सची मॅच संपली झटपट
आयपीएल 2022 मध्ये यंदा लखनऊ आणि अहमदाबाद या दोन शहरांच्या टीम पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत. या दोन शहरांच्या समावेशानंतर पुढील सिझनमध्ये एकूण 74 मॅच होणार आहेत. जानेवारी महिन्यात या स्पर्धेचे ऑक्शन होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Punjab kings, SRH