मुंबई, 17 जानेवारी : टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup) विजयी सुरूवात केली आहे. भारतीय टीमनं पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 45 रननं पराभव केला. कॅप्टन यश ढूल (Yash Dhull) आणि स्पिन बॉलर विकी ओस्तवाल (Vicky Ostwal) या विजयाचे हिरो ठरले. यशने 82 रन काढले. तर विकीने फक्त 28 रन देत 5 विकेट्स घेतल्या. पहिल्याच वर्ल्ड कप मॅचमध्ये 'प्लेयर ऑफ द मॅच' ठरलेल्या विकीचा प्रवास मोठा प्रेरणादायी आहे.
विकी 9 वर्षाचा होता त्यावेळी तो क्रिकेट खेळण्यासाठी लोणावळ्यातून मुंबईला क्रिकेट खेळण्यासाठी जात असे. तो नेहमी उशीरा येतो आणि लवकर जातो, असे त्याचे कोच मोहन जाधव यांना लक्षात आले. त्यांनी कारण विचारल्यानंतर आपण रोज लोणावळ्याहून येत असल्याचं विकीनं सांगितलं. रोजच्या रेल्वे प्रवासातच विकीची दमणूक होत असे, तरीही त्याने क्रिकेट सुरू ठेवले. तो मैदानात नेहमी फ्रेश असे.
लोणावळा हे मुंबई-पुणे मार्गावर आहे. पण क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईकर व्हायचं की पुणेकर? हे विकीला ठरवावे लागणार होते. त्यामुळे मी विकीचे वडील कन्हैया यांना फोन करून याबाबतचा निर्णय घ्यायला सांगितलं, असे त्याचे कोच जाधव यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सांगितले आहे.
विराट कोहलीनं कॅप्टनसी सोडताना फेटाळला BCCI चा मोठा प्रस्ताव
..म्हणून झाला पुणेकर
विकी मुंबईत क्रिकेट खेळत होता. त्यामुळे तो सर्वप्रथम मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये (MCA) कार्ड बनवण्यासाठी गेला. पण, त्याला कार्ड मिळाले नाही. कारण, मुंबईमध्ये जन्म झालेले खेळाडूचं एमसीएच्या स्पर्धा खेळू शकतात. त्यानंतर विकीला पुण्यात नोंदणी करण्यासाठी फोन आला.
कोच जाधव यांनी त्यावेळी विकीच्या वडिलांना पुण्यात घर किरायाने घर घेऊन राहण्याचा सल्ला दिला. विकीचा प्रवासाचा मोठा खर्च त्यामुळे वाचणार होता. विकीच्या वडिलांनी हा सल्ला मानला. त्यामुळे लोणावळ्याचा विकी मुंबईकर न होता पुणेकर बनला. पुण्यात त्याच्या क्रिकेटला गती मिळाली आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.