कोलकाता, 25 जानेवारी : पश्चिम बंगालमध्ये होणार असलेल्या निवडणुकींवरून आता राजकारण जोरात सुरू झालं आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल, अशा अफवा पसरत असतानाच तृणमूल काँग्रेसने गांगुलीवर निशाणा साधला आहे. सौरव गांगुलीला टेस्ट टीममध्ये खेळवण्यासाठी आपण शरद पवार (Sharad Pawar) यांना सांगितलं होतं, असा दावा तृणमूल काँग्रेसचे नेते सोगत रॉय यांनी केला आहे.
सौरव गांगुली मोठ्या घरातली व्यक्ती असून त्याला जमिनीवर काय चाललंय याची कल्पना नाही. अनेकवेळा गांगुलीला आपण आणि ममता बॅनर्जी यांनी टीममध्ये निवड होण्यासाठी आणि पश्चिम बंगाल क्रिकेटचा अध्यक्ष बनण्यासाठी मदत केल्याचंही सोगत रॉय म्हणाले. सौरव गांगुलीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली, तरी पश्चिम बंगाल भाजपने मात्र तृणमूल काँग्रेस (TMC) वर निशाणा साधला आहे.
अभिषेक बॅनर्जी, मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां यांनी जमिनीवर उतरून गरिबांसाठी कोणतं काम केलं आहे?, असा सवाल भाजप (BJP) ने तृणमूल काँग्रेसला विचारला आहे. सोगत रॉय शिकलेले आहेत, तसंच ते प्रोफेसर आहेत, त्यामुळे त्यांनी असं बोलू नये, अशी प्रतिक्रिया भाजप नेते शिशीर बाजोरिया यांनी दिली.
मे 2021 साली पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. बंगालमध्ये भाजपला निवडणुकीसाठी मोठा चेहरा नसल्यामुळे गांगुली हा चेहरा बनू शकतो, अशा चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहेत. सौरव गांगुलीलाही याआधी याबाबत प्रश्न विचारले होते, त्यावेळी त्याने या चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं. तसंच अमित शाह (Amit Shah) यांनी आतापर्यंत याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही, जर तसा निर्णय झाला तर त्याची माहिती सगळ्यांनाच मिळेल, असं सांगितलं होतं. सौरव गांगुली हा सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष आहे, तर अमित शाह यांचे पूत्र जय शाह बीसीसीआयचे सचिव आहेत.