दहशतवादाची भीती, तरी या 3 टीम क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार

दहशतवादाची भीती, तरी या 3 टीम क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार

2009 साली श्रीलंकेच्या टीमवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये टेस्ट मॅच खेळवली गेली नाही. आता मात्र पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतत आहे.

  • Share this:

मुंबई : 2009 साली श्रीलंकेच्या टीमवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये टेस्ट मॅच खेळवली गेली नाही. आता मात्र पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतत आहे. 2021 साली दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या प्रमुख टीम पाकिस्तानमध्ये येणार असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने सांगितलं. आम्ही इतर क्रिकेट बोर्डांसोबत संबंध आणखी चांगले करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी सांगितलं.

दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंडचा दौरा

दक्षिण आफ्रिका दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळण्यासाठी जानेवारी महिन्यात पाकिस्तानमध्ये जाऊ शकते. ही सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग असेल. यानंतर दोन्ही टीममध्ये तीन टी-20 मॅचची सीरिज होईल. न्यूझीलंडची टीम सप्टेंबर 2021 साली तीन वनडे आणि पाच टी-20 मॅचसाठी तर इंग्लंड दोन टी-20 मॅचसाठी पाकिस्तानचा दौरा करेल. 2005 सालानंतर इंग्लंडची टीम पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये जाणार आहे.

2022 साली ऑस्ट्रेलियाची टीम पाकिस्तानला जाणार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने डिसेंबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध सीरिज खेळवण्याची योजनाही बनवली आहे. तसंच क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबतही 2022 सालासाठी चर्चा सुरू आहे, अशी प्रतिक्रिया वसीम खान यांनी दिली.

2009 साली श्रीलंका टीमवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये कोणतीही टीम क्रिकेट खेळण्यासाठी जात नव्हती. 2015 साली झिम्बाब्वेने पहिल्यांदा पाकिस्तानचा दौरा केला. झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात मर्यादित ओव्हरची सीरिज खेळवण्यात आली. यानंतर मागच्यावर्षी श्रीलंका दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळण्यासाठी पाकिस्तानला गेली होती. बांगलादेशची टीमही दोन मॅचसाठी पाकिस्तानमध्ये जाणार होती, पण कोरोनामुळे हा दौरा रद्द करण्यात आला.

पाकिस्तान सुपर लीगमध्ये ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन, दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आणि एबी डिव्हिलियर्स सहभागी झाले होते. या आंतरराष्ट्रीय खेळाडूंमुळे पाकिस्तान बोर्डाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचं वसीम खान यांना वाटतं. 'या क्रिकेटपटूंनी पाकिस्तान खेळण्यासाठी सुरक्षित असल्याचं त्यांच्या देशात जाऊन सांगितलं', असं वक्तव्य वसीम खान यांनी केलं.

पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय टीम येणार असल्या तरी भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सुरू होण्याची शक्यता कमी असल्याची प्रतिक्रिया वसीम खान यांनी दिली. दोन्ही देशांमधल्या खराब संबंधामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात आयसीसीच्या स्पर्धा आणि आशिया कपमध्येच मॅच होतात.

Published by: Shreyas
First published: November 21, 2020, 8:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या