कोलंबो, 29 मार्च : एका ओव्हरमध्ये सहा सिक्स लगावण्याचा पराक्रम वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने नुकताच केला होता. आता त्यापाठोपाठ श्रीलंकेचा ऑल राऊंडर थिसारा परेरा (Thisara Perera) याने देखील या विक्रमाची बरोबरी केली आहे. श्रीलंकेतील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत आर्मी स्पोर्ट्स क्लबकडून खेळताना ब्लूमफिल्ड टीमविरुद्ध परेरानं ही कामगिरी केली. एका ओव्हरमध्ये सहा सिक्स लगावणारा परेरा हा पहिलाच श्रीलंकेचा क्रिकेटपटू आहे.
परेरानं रविवारी झालेल्या मॅचमध्ये फक्त 13 बॉलमध्ये 400 च्या स्ट्राईक रेटनं 52 रन काढले. आर्मी क्लबची बॅटींग संपण्यासाठी फक्त 20 बॉल शिल्लक होते, त्यावेळी परेरा बॅटींगला आला होता. त्यावेळी त्याने ही फटकेबाजी केली. या खेळीच्या दरम्यान परेरानं आठ सिक्स लगावले. त्यापैकी सहा सिक्स त्याने दिलन कोरे याच्या एकाच ओव्हरमध्ये लगावले. मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये परेरानं सलग सहा सिक्स लगावण्याचा पराक्रम केला.
परेराच्या फटकेबाजीमुळे आर्मी स्पोर्ट्स क्लबनं निर्धारीत 41 ओव्हरमध्ये 3 आऊट 318 रन केले. त्यानंतर ब्लूमफिल्डने 17 ओव्हरमध्ये 6 आऊट 73 रन काढले होते. त्यावेळी खराब सूर्यप्रकाशामुळे ही मॅच थांबवावी लागली. त्यानंतर खेळ पुढे सुरु न होऊ शकल्यानं कोणत्याही निर्णयाविना मॅच रद्द करावी लागली.
( वाचा : IND vs ENG : 'हे' पाच जण ठरले भारताच्या वन-डे मालिका विजयाचे हिरो )
एका ओव्हरमध्ये सलग सहा सिक्स लगावणारा परेरा हा श्रीलंकेचा पहिलाच क्रिकेटपटू आहे. तर आजवर आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमध्ये ही कामगिरी एकूण नऊ जणांनी केली आहे. गॅरी सोबर्स, रवी शास्त्री, हर्षल गिब्ज, युवराज सिंग, रॉस व्हिटले, हझरतउल्ला झाझाई, लिओ क्रेटर आणि कायरन पोलार्ड यांनी ही कामगिरी केली आहे. आता या दुर्मिळ बॅट्समनच्या यादीत परेराचा समावेश झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.