मुंबई, 22 ऑक्टोबर : टेस्ट क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा (Brian Lara) च्या नावावर आहे. मागच्या 16 वर्षांपासून लाराचा हा विक्रम कोणालाही मोडता आला नाही. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये लाराने 400 रनची खेळी केली होती. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)च्या मते दोनच खेळाडू लाराचा हा विक्रम मोडू शकतात.
सोशल मीडियावर सेहवागने त्याचा कार्यक्रम 'वीरू की बैठक' या कार्यक्रमात डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) लाराचा विक्रम मोडू शकतात, अशी भविष्यवणी केली आहे. रोहित शर्माने दीड दिवस बॅटिंग केली, तर हा विक्रम त्याच्या नावावर होऊ शकतो, असं सेहवाग म्हणाला आहे.
रोहित, वॉर्नरचं रेकॉर्ड
आकडे बघितले तर रोहित शर्माचं टेस्ट रेकॉर्ड एवढं चांगलं नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये रोहितचा सर्वाधिक स्कोअर 212 रन आहे. पण वनडेमध्ये रोहितने 3 द्विशतकं केली आहेत. याच कारणामुळे सेहवागने लाराचा विक्रम तोडण्याची क्षमता रोहितमध्ये असल्याचं सांगितलं. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने मागच्या वर्षी ऍडलेडमध्ये पाकिस्तानविरुद्ध 335 रनची नाबाद खेळी केली होती.
माझ्या नशिबात लाराचा विक्रम तोडणं नव्हतं, कारण मी घाईमध्ये असायचो, असं वक्तव्य सेहवागने केलं आहे. सेहवागच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकं आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्ध 309 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 319 रनची खेळी केली होती. मॅथ्यू हेडन लारानंतर टेस्ट क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. हेडनने झिम्बाब्वेविरुद्ध 380 रनची खेळी केली होती.