मुंबई, 18 नोव्हेंबर : कोरोना व्हायरस (Corona Virus) मुळे क्रिकेटचा 2020 सालचा संपूर्ण मोसम फुकट गेला. कोरोनामुळे अनेक स्पर्धा आणि सीरिज स्थगित करण्यात आल्या, पण नव्या वर्षात क्रिकेटचं पुनरागमन होणार आहे. यासाठी खेळाडू आणि क्रिकेट रसिकांना बरीच वाट पाहावी लागली. 2020 सालचा मोसम कोरोनामुळे प्रभावित झाल्याने 2021 साली भारतीय क्रिकेट टीम (Team India) लागोपाठ 12 महिने क्रिकेट खेळणार आहे. 2021 साली टीम इंडियाला एक महिनाही आराम मिळणार नाही.
इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार पुढच्या वर्षी टीम इंडिया लागोपाठ 12 महिने क्रिकेट खेळेल. 2021 मध्ये भारतीय टीम 14 टेस्ट, 13 वनडे आणि जवळपास 29 टी-20 मॅच खेळणार आहे. याशिवाय आयपीएल, जून महिन्यात आशिया कप आणि ऑक्टोबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कपही होणार आहे. यामुळे मॅचची संख्या वाढणार आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या पुढच्या वर्षीच्या वेळापत्रकाबाबत अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही. जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परतल्यावर भारताची इंग्लंडविरुद्ध दोन महिन्यांची मोठी सीरिज होणार आहे.
असं असणार टीम इंडियाचं वेळापत्रक?
इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर आल्यानंतर दोन्ही टीममध्ये 4 टेस्ट, 4 वनडे आणि 4 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाईल. यानंतर एप्रिल महिन्यात आयपीएल, जून आणि जुलै महिन्यात आशिया कप, जुलै महिन्यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 3 वनडे, जुलै ते सप्टेंबर महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज, ऑक्टोबर महिन्यात भारत-दक्षिण आफ्रिकेत 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कप, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात न्यूझीलंड आणि भारतात 2 टेस्ट, 3 टी-20 मॅचची सीरिज. डिसेंबर महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत 3 टेस्ट आणि 3 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाण्याची शक्यता आहे.